Press "Enter" to skip to content

द्रोणागिरी किल्ल्यावर नव परिवर्तन संस्थेसोबत बच्चे कंपनीने आनंद लुटला


सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी । 🔷🔶🔶🔷

द्रोणागिरी किल्ल्यावर आज नव परिवर्तन संस्थेच्या सहकार्याने नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ व बोरी ग्रामस्थ यांच्या वतीने बच्चे कंपनीची सहल आयोजित करण्यात आली होती. यावेळी बच्चे कंपनीने मनसोक्त आनंद लुटला.

उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ला गेली अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. परंतु नव परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून किल्ल्याचे संवर्धन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नाना काही दिवसांतच यश येत पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

रविवारी तर दिवसभर पर्यटक येजा करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते.
नवरात्रात नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ व बोरी ग्रामस्थांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षीही किल्ल्यांची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या बक्षिस समारंभा प्रसंगी सहभागी झालेल्या बच्चे कंपनीला आयोजकांनी द्रोणागिरी किल्ल्यावर घेऊन जाण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता आज करण्यात आली.

द्रोणागिरी किल्ल्यावर संवर्धन करणारी नव परिवर्तन संस्थेच्या सहकार्याने आज सकाळी ६ वाजता किल्ल्यावर चढण्यास सुरुवात केली. यावेळी बच्चे कंपनीचा उत्साह हा तरुणाला लाजवणार असा दिसत होता. काही वेळातच बच्चे कंपनीची स्वारी पोहचली. गडावर पोहचल्यानंतर नव परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष विरेश मोडखरकर व सचिव हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी किल्ल्याची माहिती सांगितली. त्यानंतर सीआयएसएफचे अधिकारी राणा यांनी येथील कंपनीपासून कशाप्रकारे खबरदारी घ्यायची व आग लागल्यानंतर कोणती दक्षता घ्यावयाची यावर मार्गदर्शन करीत नव परिवर्तन संस्थेमुळे पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर बच्चे कंपनीला किल्ल्याचा परिसर, पाण्याचा हौद, गणेश मंदिर, वेताळ देव, पाण्याचे तळे आदी ठिकाणी दाखविण्यात आली. यावेळी बच्चे कंपनी व त्यांना घेऊन आलेले मंडळ व ग्रामस्थ यांच्या चेहरा प्रसन्न झाल्याचे दिसत होते. जवळपास ५० पेक्षा अधिक लहान मुले सामील झाली होती.

नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अतुल ठाकूर व बोरी ग्रामस्थ व कामगार नेते संतोष पवार यांनी गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याला उजाळा देण्याचे काम नवपरिवर्तन संस्थेच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतल्यामुळेच आज दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याचे दिसतात. त्यामुळेच आम्ही आजची बच्चे कंपनीची सहल यशस्वी करू शकलो असल्याचे सांगत नवपरिवर्तन संस्थेला धन्यवाद दिले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.