Press "Enter" to skip to content

ठेकेदार संघटनेचे उपोषण अधीक्षक अभियंत्यांनी दिलेल्या अश्वासनामुळे स्थगित

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔶🔷🔷


कर्जत आणि खालापूर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांच्या निविदा ऑनलाईन न काढता ऑफलाईन काढून भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारा मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता स्तरावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप कर्जत ठेकेदार संघटना उपोषण सुरू केले होते. हे उपोषण अधिक्षक अभियंत्यांनी दोन महिन्यात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.

कर्जत ठेकेदार संघटनेच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टयाचाराविरोधात उपोषण सुरू केले होते. कर्जत तालुका ठेकेदार संघटना अध्यक्ष राहुल डाळिंबकर उपोषणाला बसले होते. त्यांना सर्व ठेकेदारांनी पाठिंबा दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे, निवृत्त अधिक्षक अभियंता आर. एस. पाटील आणि शाखा अभियंता प्रदीप माळी यांचा मनमानी कारभार आणि केलेला भ्रष्टाचार यामुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील तब्बल 134 कोटी रुपयांची विकास कामे दोन वर्षांपासून सुरू झाली नाहीत आणि त्यामुळे कर्जत आणि खालापूर तालुका विकासापासून वंचीत राहिला आहे. तसेच उपअभियंता अजयकुमार सार्वगौंड यांच्या कारभाराचीही चौकशी करावी अशी मागणीही या उपोषणात करण्यात आली होती.

आमदार महेंद्र थोरवे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विंनती केली होती परंतु सार्वजनिक खात्याचे वरिष्ठ अधिकारी येऊन याबाबत काही कारवाई करीत नाहीत. तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही. असे सांगून उपोषण मागे घेण्यास नकार दिला. कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे आणि शाखा अभियंता प्रदीप माळी सुद्धा उपस्थित होते. काल सायंकाळी पुन्हा आमदार महेंद्र थोरवे अधिक्षक अभियंता राजाराम गोसावी उपोषण स्थळी आले. त्यांनी चर्चा करून संबंधितांची चौकशी करून दोन महिन्यात दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच अशोक भोपतराव यांनी उपअभियंता अजयकुमार सर्वगौड यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी असे पत्र दिले.

अधीक्षक अभियंता गोसावी यांनी त्यांचीही चौकशी करू असे तोंडी सांगितले. तद्नंतर राहुल डाळिंबीकर यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. आमदार थोरवे यांच्या हस्ते सरबत घेऊन डाळिंबकर यांनी उपोषण सोडले मात्र दोन महिन्यात कारवाई झाली नाही तर याच ठिकाणी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले जाईल असे त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन भगवान चव्हाण यांनी केले.

आमदार थोरवे यांनी, ‘यापुढे माझ्या मतदार संघात उपोषण होणार नाही असे पहावे कारण सरकार आमचे आहे. अधिकारी वर्गाची मनमानी चालणार नाही. त्यांनी मतदार संघात चांगले काम करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई झाल्या शिवाय राहणार नाही मग तो कुणीही असो.’ असे स्पष्ट केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक अरुण भोर, उपअभियंता अजयकुमार सर्वगौड, संतोष भोईर, खालापूर तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष उदय गावंड, संभाजी जगताप, भाजपचे किसान मोर्चाचे सुनील गोगटे, भास्कर दिसले, उदय पाटील, किरण ठाकरे, प्रमोद खडे, शरद बडेकर, सचिन ओसवाल, जब्बार सय्यद आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.