सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔶🔶
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे सलून व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती पूर्णतः ढासळली असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वाढीव अव्वाच्या सव्वा वीज देयक दिल्यामुळे सलून व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सलून व्यावसायिकांना वीज बिलात ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी रायगड जिल्हा नाभिक संघांचे अध्यक्ष दिनेश मोरे यांनी विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे.
रायगड जिल्हा नाभिक संघांचे अध्यक्ष दिनेश मोरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने २२ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केल्यानंतर टप्याटप्याने इतर सर्व व्यवसाय सुरू झाले. परंतु सलून व्यवसाय लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्यात चालू झाले. लॉकडाऊनच्या कालावधीत सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर थोडया फार प्रमाणात सलून व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्न मिळू लागले. असे असले तरी त्या उत्पनाने ते फक्त्त दोन वेळच्या जेवणाचा खर्च भागवू शकतात. कारण आता पहिल्या सारखे ग्राहक दुकानात येत नाहीत. पूर्वी दाढी करण्यासाठी ग्राहकांची संख्या बरीच होती परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहक घरीच दाढी करण्यास शिकले आहेत. याचा रोजच्या मिळकतीत फटका बसला आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांना इतर वाढीव खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शासनाने वीज बिलात ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी दिनेश मोरे यांनी केली आहे.








Be First to Comment