Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील मच्छीविक्रेत्यांचे पुन्हा रहदारीच्या रस्त्यावर बस्तान

ग्रामविकास अधिका-यांचे दुर्लक्ष : नागरिकांची कारवाईची मागणी 🔷🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔶🔶🔶

नागोठणे ग्रामपंचायतीकडून येथील मासळी बाजारात बसविण्यात आलेल्या मच्छिविक्रेत्यांनी काही दिवसांपासून आपला मोर्चा पुन्हा एकदा रहदारीच्या रस्त्याकडे वळविला आहे. याचबरोबर खुमाचा नाका, बँक आॅफ इंडिया समोरील रस्ता व वनखात्यासमोरील रस्त्यावरही बाहेरील मच्छी विक्रेते येऊन मच्छी विक्री करीत आहेत. त्यामुळे या सर्वच ठिकाणी मच्छी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोनाची दुसरी लाट दिवाळी नंतर येण्याची शक्यता यंत्रणेकडून वर्तविण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन सर्व शासकीय यंत्रणेला केलेले असतांनाच ग्रामपंचायतीत महत्वाची भुमिका असणाऱ्या नागोठणे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांचे रस्त्यावरील मच्छी विक्रेत्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. त्यामुळेच ग्रामपंचायत प्रशासनाने अतिशय मेहनत घेऊन मासळी बाजारात बसविलेल्या व रहदारीच्या रस्त्यावर पुन्हा बस्तान बसविलेल्या या मच्छी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरात दहशत निर्माण झाल्या नंतर नागोठणे कोळीवाड्यातील महत्वाच्या रहदारीच्या रस्त्यावर गेली अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या मच्छी विक्रेत्यांना मासळी बाजारात बसविण्याचे महत्वाचे काम १७ मार्चला नागोठणे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्याने अनेक वर्षानंतर मोकळा श्वास घेतला होता. संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये व आपल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी स्वत: डॉक्टर असलेल्या सरपंच मिलिंद धात्रक यांनी रस्त्यावरील मच्छी विक्रेत्यांना मासळी बाजारच्या इमारतीत बसविण्याच्या घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले होते.

त्यानंतर काही दिवसांनीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने येथील मटन, चिकन व मच्छी विक्रीवर बंदी आणली होती. मात्र शासनाच्या सुचनेनुसार ही बंदी उठविण्यात आल्यानंतर मटन, चिकन विक्रेत्यांनी मटन मार्केट इमारतीत आपापली दुकाने सुरु केली. मात्र मच्छि विक्रेत्यांनी मासळी बाजारात न बसता पुन्हा एकदा रस्त्यालाच आपली पसंती दिली आहे. सध्या तर कोळीवाड्यातील रस्त्याबरोबरच एस.टी. स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्या रस्त्यालगत हे मच्छीविक्रेते बसु लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर रहदारीस अडथळा होण्याबरोबरच रस्त्यालगत होणाऱ्या मच्छीच्या घाणीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

नागोठण्यात पुन्हा एकदा रहदारीच्या रस्त्यावर मच्छी विक्री करण्यास आलेल्या आम्हा स्थानिक मच्छी विक्रेत्यांवर कारवाई करतांनाच बाहेरून येणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर कारवाई का नाही ? असा प्रश्नही स्थानिक मच्छी विक्रेते उपस्थित करीत आहेत. दरम्यान कोरोनाच्या विळख्यातून जनता सुटलेली नसतांनाच येथील सर्वच रस्त्यांवरील मच्छी विक्रेत्यांवर ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी सांगितले की, बाहेरील मच्छी विक्रेत्यांच्या रस्त्यावरील मच्छी विक्रेत्यांवर बंदी आणून कोळी वाड्यातील अंतर्गत रस्त्यावर मच्छी करणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांवरही तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच स्थानिक मच्छी विक्रेत्यांना मासळी बाजारच्या इमारतीत बसविण्यासह आवश्यक ती उपाययोजना लवकरच करण्यात येईल असेही दिवकर यांनी स्पष्ट केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.