नागोठण्यात स्वच्छतेचे तीन तेरा : मुख्य रस्त्यालगत कचऱ्याचा ढीग 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶🔷
नागोठणे ग्रामपंचायतीच्या “रोल माॅडेल” चा एक भाग असलेली घंटा गाडी रोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी गावात स्वच्छ अभियानाचा नारा देत फिरत असते. परंतु गावात काही ठिकाणी साचलेला कचऱ्याचा ढीग घंटागाडीतील कर्मचाऱ्यांना दिसत नाही. नागोठणे एस.टी. स्थानकापासून ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिराकडे जाणारा मुख्य रस्त्यालगत पोलिस ठाण्याजवळ पोलिसांच्या विश्रांतीसाठी असलेल्या खोल्यां शेजारीच गेले कित्येक महिने कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. गौरी गणपतीसह नवरात्रौत्सवातही तसेच आता दिवाळीतही तो कचऱ्याचा ढीग जैसे थे या स्थितीतच आहे . त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून याच रस्त्यावरून ग्रामपंचायतीत नेहमी येणारे ग्रामविकास अधिकारी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने याबाबत काही प्रतिष्ठित नागरिक ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रोल मॉडेल नागोठणे म्हणून मिरवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या रोल मॉडेल मोहिमेत स्वच्छता हा एक महत्वाचा उपक्रम आहे हे ग्रामपंचायत प पर्यायाने ग्रामविकास अधिकारी विसरलेले असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. याच रोल मॉडेल नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिका-यांना नागोठण्यात काही ठिकाणी साचलेला कचऱ्याचा ढीग दिसत नाही का ? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान नागोठणे ग्रामविकास अधिकारी यांचे जाणे येणे याच रस्त्यावरून आहे. त्यांनी आपल्या आलिशान गाडीतून जरूर जावे यावे परंतु आजूबाजूला देखील नजर ठेवावी जेणे करून त्यांना गावातील कचऱ्याचा ढीग दिसेल अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीची घंटागाडी गावात फिरत असते. त्यावेळी त्या त्या परिसरातील महिला व नागरिक स्वतःहून या गाडीत कचरा टाकण्यासाठी येत असतात. मात्र शहरातील मोदी पार्क समोरील रस्त्यालगत, नागोठणे पोलिस ठाणे व इतर काही ठिकाणी अजूनही कचरा टाकलेला पहावयास मिळत आहे. शहरातील कचरा कुंड्या नष्ट केल्यानंतर बहुतांश भागात नागरिकच घंटा गाडीत कचरा टाकत असल्याने सफाई कामगारांचे ते काम ब-यापैकी कमी झाले आहे. मात्र इतर काही ठिकाणी जमा होत असलेला कचरा घंटागाडीतील कर्मचाऱ्यांना दिसत नाही का. त्यामुळे ग्रामपंचायतीचे तसेच शासकीय सेवक व ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम करणाऱ्या ग्रामविकास अधिका-यांचे यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचेच दिसून येत आहे. तसेच आपल्यावर राजकीय वरदहस्त असल्याने आपले कोणी काहीही करु शकत नाही या भ्रमात हे ग्रामविकास अधिकारी आहेत की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. म्हणूनच की काय, नागोठण्यातील अनेक गैरप्रकारांकडे त्यांनी काना डोळा केल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
नागोठणे पोलीस ठाण्यात आपल्या काही कामानिमित्त जिल्ह्यातील अनेक नागरिक येत असतात त्यांना पोलीस ठाण्यालगतचा कचऱ्याचा ढीग नजरेज पडत असतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात गावाची प्रतिमा मलीन होत आहेच परंतु सध्या कोरोना महामारीचे संकट असताना देखील ग्रामपंचायती कडून योग्य रित्या स्वच्छता मोहीम राबविली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दरम्यान नागोठण्यातील विविध ठिकाणी साचलेला कचऱ्याचे ढीग उचलून तो परिसर स्वच्छ करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
यासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गावातील कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची घंटा गाडी नियमित गावातून फिरत असते तरी सुद्धा काही नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकला जातो. मी गावातील पहाणी करण्यासाठी नेहमी गावातून फेरफटका मारत असतो. येत्या आठ दिवसात ग्रामपंचायत हद्दीत आम्ही पुन्हा स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे मोहन दिवकर यांनी सांगितले.








Be First to Comment