Press "Enter" to skip to content

आदिवासी तरुणांनी दाखवली माणुसकी : महामार्गावर सापडलेली पर्स केली परत

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔶🔶

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीवरुन प्रवास करतांना सुकेळी खिंडीच्या अलिकडे खैरवाडी गावाजवळ पडलेली लेडीज पर्स ऐनघर जवळच असलेल्या पोलिस चौकीमध्ये जमा करुन अजुनही माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन सुकेळी-गणपतवाडी येथील दोन आदिवासी तरूणांनी घडविले आहे.

उपलब्ध माहीतीनुसार मुंबई -गोवा महामार्गावरुन दुपारी प्रवास करत असणा-या पल्लवी अमित पाटील रा. कुसुबंले, अलिबाग या आपल्या पतीसोबत दुचाकीवरुन कोलाडकडे जात असतांना महामार्गावरील खैरवाडी गावाच्या पुढे रस्त्यावरच त्यांची पर्स पडली होती. याच दरम्यान तेथुन नेहमीच कोलाड येथे केबल लाईनचे काम करण्यासाठी दुचाकीवरुन जाणारे सुकेळी जवळील गणपतवाडी येथील गंगाराम शिद व नरेश वारगुडे यांना एक पर्स रस्त्यावर पडलेली दिसली. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती पर्स तेथुन उचलुन जवळच असलेल्या ऐनघर पोलिस चौकीत जमा केली.

त्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक घोलप यांनी संपुर्ण पर्सची तपासणी केली. त्यामध्ये काही दागिने, ८०० रुपयांची रोख रक्कम व आधार कार्ड आढळुन आला. नंतर वाकण पोलिस चौकीतील उपनिरिक्षक परशुराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली वाकण टॅपचे तानाजी आगलावे, अथर्व पाटील, चव्हाण यांनी आधारकार्ड मार्फंत पर्स मालक यांचा शोध घेऊन त्यांना ऐनघर चौकी येथे बोलावुन ती पर्स व सर्व वस्तु त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. यावेळी पर्स मालक पल्लवी पाटील यांच्या चेह-यावर एक वेगळाच आंनद पहावयास मिळाला.

आदिवासी समाजाचे असुनही गंगाराम शिद व नरेश वारगुडे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे पर्स मालक, पोलिस कर्मचारी व परिसरातील नागरिकांतून कौतुक करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.