सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔷
दिपावली आधीच लहान मुले तरुणांना वेध लागतात ते मातीचे गड, किल्ले बनविण्याचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात सर्वत्रच असे गड-किल्ले बनविण्यासाठी बच्चे कंपनीची लगबग सुरु असल्याचे आपल्याला पहायला मिळते.
याबाबतीत नागोठण्यातील तरूणही मागे नाहीत हे त्यांनी प्रतापगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती पाच दिवसांत तयार करुन दाखवून दिले आहे. नागोठणे खडक आळीतील चेतन तेलंगे, कल्पेश वाळंज, रोहित राऊत, पतु वाळंज व सिध्देश तेलंगे या तरुणांनी प्रतापगड किल्ल्याच्या या प्रतिकृतीच्या उभारणीत मोलाचा हातभार लावला आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या स्थापनेत ज्या अनेक किल्ल्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे व त्या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आजही अबाधित आहे. त्या किल्ल्याचे जतन होणे किती गरजेचे आहे. तसेच या गड किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महारांजाच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास याविषयीची जनजागृती करण्याचे कामच लहान मुले, तरुण करीत असतात. याच उद्देशान प्रेरित होऊन खडक आळीतील या पाच तरुणांनी खडक आळीतील प्रवेश द्वारातच असलेल्या पारा जवळ प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार केली आहे.
या किल्ल्याला केलेली रंगीबेरंगी विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरत आहे. सध्या या प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती बघण्यासाठी लहान मुले, तरूण-तरूणी यांच्यासह शहरातील नागरिकांची गर्दी होत आहे. किल्ल्याची प्रतिकृती बघितल्या नंतर किल्ल्या सोबत फोटो काढण्याचा, सेल्फी काढण्याचा मोह येथे येणाऱ्यांना आवरता येत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी तर प्रतापगड किल्ल्याची ही प्रतिकृती समाज माध्यमांवर पसरवून किल्ला बनविणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले आहे. त्यामुळेच हा प्रतापगड किल्ला साकारणा-या खडक आळीतील या पाच तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.








Be First to Comment