कुहीरे आदिवासी वाडीच्या खावटी अनुदान योजनेसह सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे ना.आदितीताई तटकरे यांचे आदेश 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔶🔶
नागोठण्याजवळील कुहीरे ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या पुनर्वसित कुहीरे आदिवासी वाडीच्या (पूर्वीची बेणसे आदिवासी वाडी) खावटी अनुदान योजना सन २०२०-२१ च्या अंमलबजावणीसह कुहीरे आदिवासी वाडीच्या पुनर्वसनातील सर्व त्रुटी दूर करण्यासह त्यांच्या इतरही सर्व समस्या मार्गी लावण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासाठी राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कुहीरे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदयभाऊ जवके यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात एक महत्वपूर्ण आढावा बैठक बुधवारी (दि.११) मंत्रालयात ना. अदितिताई तटकरे यांच्या आदेशाने आयोजित करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक श्री. राजुरे, आदिवासी विकास प्रकल्पाच्या रायगड जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती. शशिकला अहिरराव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदयभाऊ जवके, कुहिरेचे उपसरपंच मनोहर पारधी, अमित मोहीते, दीपेंद्र अवाद व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आदिवासी लाभार्थ्यांचे विहित पद्धतीने अर्ज तातडीने प्राप्त करावे. लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व त्याअनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून कार्यवाही पूर्ण करावी. त्यासाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास यांनी संबंधित तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड करावी. सदर योजनेच्या लाभापासून अनुसूचित जमातीमधील कोणताही लाभार्थी वंचीत राहणार नाही याची पुर्णत: दक्षता घ्यावी. शिवाय सर्वेक्षण व संपूर्ण अर्ज प्रक्रिया नोव्हेंबर २०२० अखेर पूर्ण करावी अशा सूचना ना. आदितीताई तटकरे यांनी संबधितांना केल्या.
याशिवाय पूर्वी बेणसे ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ठ असलेल्या बेणसे कातकरवाडीचे आयपीसीएल प्रकाल्पाच्या वेळी एम.आयडी.सी ने कुहीरे ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतर केले. मात्र याची पुनर्वसन खात्याकडे कोणतीही नोंद नाही. त्यामुळेच या आदिवासी वाडीतील नागरिकांकडे पुनर्वसनाचे कोणतेही दाखले नाहीत. प्रकल्पग्रस्त म्हणूनही दाखले नाहीत. या आदिवासी वाडीला स्वतंत्र विद्युत जनित्र नसल्याने सध्या येथे बेणसेवाडीतून विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय बहुतांश भाग डोंगराळ असलेल्या कुहीरे ग्रामपंचायतीच्या २२२४ या लोकसंख्येपैकी सुमारे १६०० एवढी लोकसंख्या ही आदिवासी कातकरी व ठाकूर समाजाची आहे. त्यामुळेच आदिवासी प्रकल्प अंतर्गत कुहीरे ग्रामपंचायतीची नोंद मिनी म्हाडा योजनेत व्हावी. या सर्व प्रकरणी निवेदनही यावेळी उदयभाऊ जावके यांनी ना. आदितीताई तटकरे यांना दिले. ना. आदितीताई तटकरे यांनीही याची तत्काळ दखल घेत कुहीरे आदिवासी वाडी पुनर्वसन व इतर प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना व संबधितांना दिले आहेत.
खावटी वाटप योजनेत कुहीरेतील भूमिहीन आदिवासी समाज वंचित राहु नये व त्यांना तहसिल कार्यालयाचे फेरे मारायाला लागु नये यांसह त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्नांची तातडीने दाखल घेतल्याबद्दल ना. आदितीताई तटकरे यांचे कुहिरेतील आदिवासी बांधवांकडून आभार मानण्यात आले.








Be First to Comment