सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔷🔷
पर्यटन हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या मिनिट्रेन बाबतीत कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे रेल्वेच्या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्या पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर मार्गी लावण्यात याव्यात यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी रेल्वेच्या व्यवस्थापकांना निवेदन सादर केले आहे.
आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्थानिकांच्या मागणीनुसार नुकताच अमन लॉज ते माथेरान दरम्यान मिनिट्रेनची शटल सेवा सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे निदान इथे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.इथल्या सर्वांचे जीवनमान हे माथेरानच्या मिनिट्रेन वर अवलंबून असते. केवळ मिनिट्रेनची सफर मिळण्यासाठी खासकरून पर्यटक हजेरी लावतात.

सध्या अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेच्या फक्त दोन फेऱ्या होत असून बहुतांश पर्यटकांना या सफरीचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे दस्तुरी पासून जवळजवळ तीन किलोमीटरची पायपीट करून पर्यटकांना आपल्या लवाजम्यासह माथेरान गाठावे लागत आहे.त्यामुळे त्यांची त्रेधातिरपीट उडत असून नाराजीचे सूर उमटत आहेत.
याकामी शटलच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी.असे प्रेरणा सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच शटल सेवेचा लाभ पर्यटकांना घेता यावा त्यांना स्वस्तात हा प्रवास उपलब्ध व्हावा ही शटल सेवा कार्यान्वित आहे ही माहिती उपलब्ध होण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर इंडिकेटर बसविण्यात यावेत, अमन लॉज इथे पर्यटकांसाठी उभारण्यात आलेले विश्रांती गृह खुलेे करण्यात यावे जेणेकरून ऐन गर्दीच्या वेळी पर्यटकांना आपल्या सामानासह बसण्याची व्यवस्था होऊ शकते.
अमन लॉज आणि माथेरान स्टेशन परिसरात स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत रंगरंगोटी आणि साफसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून घ्यावीत. असेेेही निवेेेदनात नमूद केले आहे.
तर मुंबई पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांना नेरळ स्टेशन वरून माथेरान गाठण्यासाठी नेहमीच मिनिट्रेनची ओढ लागलेली असते परंतु नेरळ ते माथेरान ही सेवा मागील काळापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकदा पर्यटकांचा हिरमोड होत असतो याकामी लवकरच नेरळ माथेरान ही सेवा सुध्दा लवकरच सुरू करावी यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळणार असून रेल्वेच्या उत्पन्नात सुध्दा यानिमित्ताने वाढ होऊ शकते.








Be First to Comment