नागोठण्यातील कला शिक्षकाने बनविले इतिहासाची साक्ष देणारे मावळे, तोफा, पुरातन वाद्यांसह देवदेवतांचे पुतळे 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔶🔶
रोहा तालुका कलाकुसरीमध्ये कधीही मागे राहिला नाही. काही तरी नवीन साध्य करण्याची धडपड तालुक्यातील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक व इतर विषयांच्या शिक्षकांसह युवकांमध्ये असल्याची आपणाला नेहमीच पहायला मिळते. असेच एक धडपड करणारा हाडामासाचा कलाशिक्षक नागोठणे गावातील कुंभार आळी येथील रहिवासी प्रफुल नागोठणेकर आहे.
लॉकडाऊनमध्ये घरी राहून डोक्यात वेगवेगळे विचार येत असतांनाच त्यांनी मातीचे मावळे, शिवाजी महाराजांचे पुतळे, प्राणी, त्यानंतर पारंपारीक वेशभूषा आणी देवी देवतांचे लहान मुलांना आकर्षित करणारे आणि इतिहासाला साक्ष देणारे शेकडो पुतळे तयार केले. त्यांना छान छान रंगरंगोटी करुन त्यांनी ते विक्रीस ठेवले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवत लहान मुले दिवाळीच्या सुट्टीत मातीचे किल्ले बांधण्यात व्यस्त असतात. आपला किल्ला मावळ्यांनी व महाराजांच्या प्रतिकृतीने बहरलेला असावा म्हणून मुले सैनिक, प्राणी, महाराजांचे छोट्या मुर्ती, तोफा, बारा बलुतेदार पद्धतितील लोकांच्या प्रतिकृती आणि देवदेवतांच्या मुर्ती खरेदी करुन आपण बनवीलेल्या किल्ल्यावर मोठ्या दिमाखात सजावट करत असतात. हे करत असताना पुर्वी प्लास्टिकचे रेडीमेड मावळे खरेदीकडे मुलांचा कल असायचा. आता मात्र प्लास्टिकमुक्त भारत अभियानात तालुक्यातील मुले सहभागी होऊन नागोठणे येथील कलाशिक्षक प्रफुल नागोठणेकर यांच्या मातीने बनविलेल्या मावळ्यांकडे आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे.
नागोठणे येथील कलाशिक्षक रोह्यातील शासकीय आश्रम शाळा सानेगाव येथे कार्यरत आहेत. यापूर्वीही एम.डी.एन फ्युचर स्कूल कोलाड येथे सेवेत असताना त्यांनी दरवर्षी २५० गणेश मुर्ती तयार करुन विद्यार्थ्यांकडून रंगवून घेतल्या आहेत. आणि त्याच मुर्ती विद्यार्थ्यांना प्रतिस्थापना करण्यासाठी शाळेकडून संस्थचे ट्रस्टी संदीप तटकरे यांनी विद्यार्थ्यांना भेट स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला. आज सीबीएससी बोर्डात ही शाळा नावारुपाला येताना दिसत आहे.
महत्वाचे म्हणजे प्राणी तसेच गडाचे आणी प्रजेचे रक्षणासाठी असणारे मावळे तोफ़ा तसेच किल्ले सुद्धा मुलांच्या कुतूहलासाठी तसेच इतिहासाच्या महितीसाठी असतात. आणि याचाच भाग म्हणून मातीच्या मावळे बनविण्याचा एक चांगला प्रयत्न या लाॅकडाउनच्या काळात प्रफुल नागोठणेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. हे पुतळे मुलांचे आकर्षणाचे साधन ठरत असल्याने मुलांची मावळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे असे कलाशिक्षक प्रफुल नागोठणेकर यांनी सांगितले.








Be First to Comment