Press "Enter" to skip to content

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापिका सुनिता वढावकर सेवानिवृत्त

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔷

नागोठण्यातील गांधी चौक परिसरातील रहिवासी व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापिका सौ. सुनिता अभय वढावकर या ४० वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या.

याच दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने नागोठण्यातील कामत हाॅटेल मध्ये त्यांच्या कुटुंबियांकडून आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सौ. सुनिता वढावकर यांना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

नागोठण्याचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य शैलैंद्र देशपांडे, नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. महेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला नितीन देशपांडे, हरिष शहासने, नंदू देशपांडे, विवेक देशपांडे, जीवन पत्की, सौ. सुनिता वढावकर यांचे पती अभय वढावकर, दिर संजय वढावकर, जाऊबाई सुखदा संजय वढावकर, मुले स्वप्निल वढावकर, प्रतिक वढावकर, स्नुषा सई स्वप्निल वढावकर, आरती प्रतिक वढावकर आदींसह वढावकर कुटुंबीय व त्यांचा मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते.

सौ. सुनिता वढावकर या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागोठणे शाखेत क्लार्क या पदावर १९८० साली रूजू झाल्या. त्यानंतर त्यांनी बँकेचे अलिबाग येथील मुख्यालय, पेण व रोहा शाखेत क्लार्क, कॅशियर यांच्यासह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळत व्यवस्थापिका पदापर्यंत मजल मारली. आपल्या ४० वर्षांच्या सेवेत नागोठण्यातील शाखेत त्यांनी सर्वात जास्त २२ वर्षे सेवा केली. आपल्या ४० वर्षांच्या सेवेत बँकेच्या खातेदारांना सर्वोत्तम सेवा देण्याबरोबरच जनतेसाठी असलेल्या सरकारच्या अनेक योजना त्यांनी बँकेमार्फत यशस्वीपणे राबविण्याचे काम केले. त्यानंतर रोहा शाखेत त्या सेवानिवृत्त झाल्या.

त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात नागोठण्याचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक, पत्रकार महेश पवार, सौ. सुनीता यांच्या वर्ग मैत्रिणी निलिमा दफ्तरदार, हेमलता देवकते, स्वप्निल वढावकर, प्रतिक वढावकर आदिंनी आपल्या मनोगतातून सौ. सुनिता वढावकर यांना शुभेच्छा दिल्या. तर त्यांचा नातू कु. अर्णव स्वप्निल वढावकर याने आपल्या आजीच्या सेवानिवृत्ती निमित्ताने आपल्या बोबड्या बोलीत सादर केलेल्या ” माझी आजी ” या मनोगताला सर्वांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. शेवटी सौ. सुनीता वढावकर यांनीही सत्काराला उत्तर देतांना अत्यंत भावूक शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सुनीता वढावकर यांची स्नुषा सई वढावकर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.