पोलादपूर नगरपंचायतीचं गाडं पुरेशा कर्मचाऱ्यांविनाच चालविण्याचे मुख्याधिकारी लबडे यांच्यासमोर आव्हान : निवडणुकांचीही तयारी सुरू 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔷🔶🔷
पोलादपूर तालुक्याची ग्रामपंचायत असल्याने नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालेल्या नगरपंचायत पोलादपूरच्या कार्यालयीन कामकाजासह प्रशासकीय कामकाजामध्ये अपुऱ्या कर्मचारी संख्येचा अडसर कायम असून ग्रामपंचायतीमध्ये सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना समावेशनाशिवाय नगरपंचायतीचे काम करावे लागत असल्याच्या समस्येकडे गेल्या साडेसार वर्षात शासनाने लक्ष दिले नाही. परिणामी, पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे यांना नगरपंचायतीचं गाडं पुरेशा कर्मचाऱ्यांविनाच चालविण्यासह पंचवार्षिक निवडणुकांची तयारी करावी लागत असल्याने पोलादपूर नगरपंचायतीच्या भविष्यातील महत्वाच्या प्रश्नांबाबत नियोजन करण्यासंदर्भात जराशीही उसंत मिळत नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष चर्चा केली असता दिसून आले आहे.
यावेळी नगरपंचायतीचा स्वनिधी तयार होण्याकामी करआकारणीमध्ये वाढ करण्याची मंजूरी मिळाल्यास विविध महत्वाच्या कामांसाठी नगरपंचायतीला स्वतच्या उत्पन्नाची तरतूद उपलब्ध होऊ शकणार आहे.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये आकृतीबंधानुसार रिक्त मंजूर पदांची भरती अद्याप झाली नसताना दुसरीकडे ग्रामपंचायतीचा जुना कर्मचारीवर्ग समावेशनाअभावी केवळ पुर्वीच्याच पगारावर काम करीत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, अनुभवी कर्मचाऱ्यांना अर्धबेकारी पत्करावी लागली आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीचे 1 मार्च 2014 रोजी नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. यानंतर राज्यसरकार संवर्ग सेवानिहाय पदसंख्या मंजूर करण्यात आली आहे. ब श्रेणीचे स्थापत्य व अभियांत्रिकी सेवा 1 पद मंजूर असूनही रिक्त आहे. क श्रेणीची लेखापाल व लेखापरिक्षक मंजूर पदे दोन असून 1 रिक्त आहे. करनिर्धारण व प्रशासकीय सेवा ब श्रेणीचे 1 पद आणि क श्रेणीचे 1 पद रिक्त आहे. विकास सेवा क श्रेणीचे 1 पद मंजूर असूनही ते रिक्त आहे. त्यामुळे या सर्व संदर्भ क्रमांक 1 पैकी 6 मंजूर पदांपैकी 3 पदे रिक्त असून 3 पदे भरलेली आहेत. याखेरिज, संदर्भ क्रमांक 3 राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त लिपिक टंकलेखक 5 मंजूर पदांपैकी केवळ 1 पद भरले आहे तर उर्वरित स्वच्छता निरिक्षक 1 मंजूर पद, तारतंत्री वायरमन 1 मंजूर पद, गाळणीचालक व प्रयोगशाळा सहायक 2 मंजूर पदे, पंप ऑपरेटर विजतंत्री जोडारी 1 मंजूर पद अशा एकूण 10 मंजूर पदांपैकी 9 पदे रिक्त आहेत. मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची शिपाई, मुकादम आणि व्हाल्वमन ही तीन मंजूर पदे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनामुळे भरली गेली आहेत.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये राज्यस्तरिय संवर्गातील 19 मंजूर पदांपैकी केवळ 7 पदे भरली गेली असून 50 टक्केपेक्षा कमी कर्मचारीवर्ग असताना नगरपंचायतीच्या विकासाचं गाडं चालविण्याची जबाबदारी पोलादपूरचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी गेल्या वर्षभरात हजर होत समर्थपणे पेलली आहे. मात्र, यामुळे नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाजच व्यवस्थित सुरू ठेवण्याचा निकाराने प्रयत्न करता येत असल्याची भावना दिसून येत आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये नगरअभियंता हे पद रिक्त असल्याने महाड नगरपरिषदेचे अभियंता सुहास कांबळे हे कामकाज पाहात असून त्यांच्याकडे त्याव्यतिरिक्त 3 नगरपंचायतींची जबाबदारी असल्याने पोलादपूर नगरपंचायतीच्या बांधकाम परवानगी देणे व इतर बांधकामविषयक कामकाजाला खीळ बसली आहे. लिपिक टंकलेखक मंजूर 5 पदांपैकी 4 पदे रिक्त असल्याने बांधकाम विभाग, करविभाग, लेखाविभाग, आरोग्यविभाग आणि नळपाणीपुरवठा विभाग या विभागांची जबाबदारी एकाच लिपिकावर येत असून संबंधित विभागांच्या कामकाजातील समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये आकृतीबंधानुसार 19 कर्मचारी असण्याची गरज स्पष्ट झाली आहे. यापैकी तीन कर्मचारी लिपिक रूपेश जाधव, शिपाई प्रमोद शिंदे आणि व्हॉल्वमन यशवंत मोरे यांचे पोलादपूर नगरपंचायतीमध्ये समावेशन करण्यात आले असून पोलादपूर ग्रामपंचायतीचे जुने अनुभवी कर्मचारी लिपिक गणपत मोरे, पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत जगताप, बाळा पार्टे, रमेश जगताप, वाहन चालक दिलीप पार्टे, सफाई कामगार निलेश मोरे, जयश्री मोरे, शालीनी सोनवणे आणि निकिता निकम या 9 कर्मचाऱ्यांची अवस्था समावेशनाअभावी ग्रामपंचायतीचेही नाही आणि नगरपंचायतीचेही नाही अशा त्रिशंकू स्वरूपाची झाली आहे.
पोलादपूर नगरपंचायतीसमोर आगामी काळात पंचवार्षिक निवडणुकांचे काम सुरू होणार असून लोकसंख्येनिहाय प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण, प्रत्यक्ष मतदार याद्यांचे प्रारूप व सुधारणा तसेच अन्य कामी कर्मचारीसंख्या अपुरी पडणार आहे. अनुभवी कर्मचारी यशवंत मोरे यांना एकेकाळी मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत चेकवर स्वाक्षरी करण्यापर्यंतचे अधिकार देण्यात येऊनही प्रत्यक्षात त्यांना निर्धारित शैक्षणिक पात्रतेअभावी समावेशनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पोलादपूर नगरपंचायतीचा स्वनिधी वाढण्यासाठी मालमत्तेच्या स्वरूपानुसार करआकारणीत वाढ होऊन 2 रूपये 40 पैशांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. मात्र, याकामी मालमत्तांचे मूल्यमापन करण्यासाठी नगरअभियंत्याचे रिक्त पद तातडीने भरण्याची गरज आहे. पोलादपूर नगरपंचायतीची नगररचना, अग्निशमन यंत्रणा, कचरा व्यवस्थापन, फिल्टरेशन प्लांट, बांधकाम आणि अंतर्गत रस्ते तसेच अन्य महत्वाच्या भविष्यातील विकासाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण कर्मचारी क्षमता असण्याची गरज स्पष्ट दिसून येत असून वेळप्रसंगी इमारतींच्या वैध व अवैधतेची नोंद करण्यासाठी खासगी एजन्सीजची नियुक्तीही करण्याची आवश्यकता भासणार आहे. मात्र, हे सर्व परस्पर संबंधित विषय एकमेकांमध्ये गुंतलेले दिसून येत असून तूर्तास तरी कर्मचाऱ्यांची भरती केल्याखेरिज पोलादपूरकरांना नागरी सुविधांमधील उणिवांतून सुटका होणे अशक्य आहे.







Be First to Comment