Press "Enter" to skip to content

पोलादपूरच्या हजारो विद्यार्थ्यांच्या आदर्श शिक्षिका अस्मिता तलाठी सेवानिवृत्त

सहकारी शिक्षकांनी दिला सेवावृत्तीबद्दल समारंभपूर्वक निरोप 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔷🔶🔷

गेल्या जवळपास तीन दशकांच्या शिक्षकीपेशातील सेवेमध्ये पोलादपूर तालुक्यात हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आदर्श शिक्षिका रयत शिक्षण संस्था सातारा संचलित न्यू इंग्लिश स्कूल तुर्भेच्या मुख्याध्यापिका अस्मिता तलाठी यांना सेवानिवृत्तीबद्दल समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे इन्स्पेक्टर संजय मोहिते, सहायक इन्स्पेक्टर शहाजी फडतरे, जनरल बॉडी सदस्य निवास शेठ, तुर्भे न्यू इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ सदस्य सुभाष शेठ, सुदास मोरे, तुर्भे स्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक एस.ए.शेठ, पोलादपूर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक के.बी. पाटील, नागांव प्रशालेचे मुख्याध्यापक तटकरे यांच्यासह अस्मिता तलाठी यांचे पती तुषार तलाठी, स्नुषा केतकी, मुलगा प्रथमेश तसेच आप्तपरिवार उपस्थित होता.

निरोपसमारंभाच्या प्रमुख भाषणात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य निवास शेठ यांनी, तलाठी मॅडम यांनी 29 वर्षे 4 महिने सेवाकाळातील तब्बल 28 वर्षे सेवा पोलादपूर विद्यामंदिरात केल्याने पोलादपूर प्रशालेतील विद्यार्थ्यांचा निकाल नेहमीच तालुक्यात अव्वल दिसून आला आहे, असे आवर्जून सांगितले. यावेळी विविध मान्यवरांच्या मनोगतांसोबत स्थानिक सदस्य सुदास मोरे यांनी तुर्भे न्यू इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक प्रगतीला सुरूवात झाली असताना तलाठी मॅडम यांनी मुख्याध्यापकपदाची सुत्रे घेतल्याची जाणीव पंचक्रोशीमध्ये दिसून आली. त्यामुळे या न्यू इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावताना तलाठी मॅडम यांना अजून थोडा काळ मिळाला असता तर या भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिकच उज्ज्वल झाले असते, असे मत मांडले.

यावेळी तुषार तलाठी यांनी, आपण मुळचे पोलादपूर येथील असूनही अस्मिता तलाठी हिच्यासोबत लग्न झाल्यानंतर माझी ओळख तलाठी मॅडमचा पती अशी झाली. त्यावरूनच तिच्या शैक्षणिक कामातील विद्यार्थ्यांवरील प्रभाव दिसून येत असून या मेहनतीचा अभिमानच वाटत असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. तलाठी मॅडम यांच्या सुनबाई सौ.केतकी यांनी यावेळी, आईंचे विद्यार्थी पुण्यातील प्रत्येक क्षेत्रात मोठमोठया पदावर असल्याने आम्हाला कोणतीही अडचण आली तर एखादा अधिकारी आमचे नांव वाचून पोलादपूरच्या तलाठी मॅडमचा विद्यार्थी असल्याचे सांगून मदतीला येत असल्याचा अनुभव आल्याचे सांगून तलाठी मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याचा त्यांच्या विद्यार्थी वर्गावरील प्रभाव अनेक पिढयांना उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी अस्मिता तलाठी मॅडम यांचा त्यांच्या पतीसह सत्कार करण्यात आला तसेच संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देऊन सेवानिवृत्तीबद्दल केक कापण्यात आला. पोलादपूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी यावेळी त्यांच्या आवडत्या तलाठी मॅडमना सेवानिवृत्त जीवनाच्या शुभेच्छा देण्यास उपस्थित होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.