सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
दिवाळी बोनस म्हणून एका महिन्याचा पगार द्या अशी मागणी करणाऱ्या कामगारांना थेट गेटच्या बाहेर काढण्याची गुस्ताखी उरणच्या कोप्रोली गाव परिसरातील ग्लोबिकॉन नामक कंटेनर यार्ड प्रकल्प प्रशासनाने केली आहे.
कामगारांना कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता कंपनीने अवलंबिलेल्या या धोरणाचा भारतीय कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी निषेध केला आहे. या सर्व प्रकाराबाबत ग्लोबिकॉन व्यवस्थापनाची बाजू ऐकूण घेण्यासाठी कंपनीचे अधिकारी श्री लक्षासाहेब यांना सातत्याने संपर्क साधूनही त्यांनी याबाबत आपले कोणतेही म्हणणे मांडलेले नाही.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी अतिशय स्वस्तात विकत घेऊन विकत घेतानाच नोकरीवर घेण्याचे दिलेल्या आश्वासनानुसार ज्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या आहेत त्या सर्व कामगारांना कंपनीने गेटच्या बाहेर काढून आयत्यावेळी माथाडी कामगारांच्या माध्यमातून काम चालविले असल्याने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे.
उरण तालुक्यात शेतकऱ्यांकडून जमिनी घेतांना फारच गोड बोलून जमिनी खरेदी केल्या जात आहेत त्यानंतर जमिनीचे मालक म्हणून नोकरीवर लागणाऱ्या कामगारांची मात्र पिळवणूक होत असल्याचे हे आणखी एका उदाहरण समोर आले आहे.
यापूर्वी अशाच प्रकारे शेतकऱ्यांकडून स्वस्तात जमिनी खरेदी करून त्यावर प्रकल्प उभारून काही वर्षे काम केल्यावर तो प्रकल्पच बंद केल्याची घटना कोप्रोलीत घडली होती. त्या ट्रान्स इंडियाच्या कामगारांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याची घटन आहे.
उरण तालुक्यात जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने तालुक्याच्या ग्रामीण भागात कंटेनर यार्ड वसविण्याचे गेल्या काही वर्षांपासून फॅडच आले आहे. मिळाली जमीन की टाक कंटेनर यार्ड अशी तालुक्याची अवस्था झाली आहे हे करतांना अनेक प्रकलपांनी महसूल खात्याचे अनेक नियम पायदळी तुडविले आहेत. अनेकांना तर सार्वजनिक बांधकाम खात्याची रस्ते जोडणीची परवानगी देखील नाही.
काही प्रकल्पानी आपल्या प्रकल्पाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेतीत जाण्याचे रस्ते देखील ठेवलेले नाहीत. मात्र प्रशासनाचा गांधारी झाला असल्याने आंधळा राजाचा आंधळा कारभार तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोप्रोली – पाणदिवें गावाच्या परिसरात असलेल्या ग्लोबिकॉन नामक कंटेनर यार्ड प्रकल्पाने आपल्याकडे कंत्राटदारामार्फत काम करणाऱ्या कामगारांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
या कामगारांनी अखेर कंपनीच्या प्रवेश द्वारावरच धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत कंपनीने आपली कोणतीही बाजू मांडलेली नाही तर कामगार मात्र आम्हाला कंपनीने दिवाळी बोनस म्हणून किमान एका महिन्याचा पगार द्यावा या मागणीवर ठाम असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी बोलतांना दिली आहे . आपली मागणी रेटून धरण्यासाठी कामगारांनी ही अचानक काम बंद आंदोलन केले होते त्यामुळेच कंपनी प्रशासनाला माथाडी आणून तातडीची कामे करावी लागल्याचे कंपनीत बोलले जात आहे.








Be First to Comment