Press "Enter" to skip to content

खड्ड्याने घेतला महिलेचा बळी

मोटारसायकलवरुन उडाल्याने मृत्यू :
अपूर्ण मुंबई गोवा महामार्ग अजून किती बळी घेणार ? 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷

मुंबई-गोवा महामार्गावरील भल्या मोठ्या खड्ड्यात मोटारसायकल आदळल्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या कल्पना किशोर लोलगे (वय ३५) रा. लोलगेवाडी ता. सुधागड (सध्या रा. आसनपोई, ता. महाड) यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कानसई येथील हाॅटेल बिजली जवळच घडला.

गेली अकरा वर्षे अपूर्ण अवस्थेतील मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यानेच या महिलेचा बळी घेतल्याने हा महामार्ग पूर्ण होणार तरी कधी व तोपर्यंत अजून किती बळी घेणार ? असे प्रश्न उपस्थित करून वाहनचालक व प्रवाशांतून याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नोकरीनिमित्त महाड तालुक्यातील आसनपोई येथे राहणारे किशोर बंडू लोलगे (वय ३७) हे आपल्या पत्नी व १० वर्षीय मुलीसह पाली-सुधागड तालुक्यातील लोलगेवाडी या आपल्या मूळ गावी येत होते. मात्र नागोठण्याजवळील कानसई गावाच्या हद्दितील हाॅटेल बिजली जवळील मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या महाकाय खड्ड्यात किशोर लोलगे यांची मोटारसायकल जोरात आदळली. त्याचवेळी मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेल्या कल्पना लोलगे या मागच्या मागे उडाल्या. त्याची कल्पना गाडीवर दोघांच्या मध्ये बसलेल्या किशोर लोलगे यांच्या दहा वर्षीय मुलीने लोलगे यांना दिली. त्याचवेळी किशोर यांनी आपली मोटारसायकल मागे फिरवली. मात्र कल्पना यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर राज्यातील बहुतांशी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झालेले असतांनाच गेल्या अकरा वर्षात विविध राजकीय पक्षांची सत्ता राज्यात येऊनही हा महामार्ग अपूर्ण ठेवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे आता बारावे – तेरावे कार्य साजरे करायचे का ? अशा भावना व्यक्त करुन वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन याप्रकरणी नागोठण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कदम हे पुढील तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.