सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
गेल्या काही दिवसांपासून नागोठणे शहर व परिसरातील गुरे चोरीला जात असल्याची चर्चा चालू असतांनाच सोमवारी (दि. २६) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नागोठण्यातील मुख्य रस्त्यावर विशाल मेडिकल समोर तीन गुरे बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. त्यामुळे नागोठणे परिसरात गुरे चोरणारी टोळी कार्यरत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळेच नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असुन पोलिसांनी या गुरे चोरणा-या टोळीचा कसुन तपास करुन कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
याबाबत नागोठण्यातील बंगले आळीतील रहिवासी शशीकांत देवळे यांनी सांगितले की, आज सकाळी चार वाजता मी मरीआईच्या मंदिरात गेलो असताना विशाल मेडिकल जवळ पांढऱ्या रंगाची स्काॅर्पिओ गाडी दिसली. गाडीतील व्यक्तींना मी त्यांना हटकले असता त्यांनी तेथून पळ काढला. तसेच गेल्या १५ दिवसांपूर्वी माझा बैल देखील चोरीला गेला असल्याचे देवळे यांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वी वरवठणे कातकरीवाडी येथे ३ ते ४ गुरे बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तर गुरांचे रक्त व मांस देखील आजूबाजूला दिसून आले होते. वरवठणे गावातील स्थानिक नागरिकांनी हे सर्व पाहिले होते. परंतु त्यावेळी या घटनेकडे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून आले होते. ही घटना ताजी असतांनाच आज सोमवार दि. २६ नोव्हेंबर रोजी पहाटे नागोठणे येथील विशाल मेडिकल जवळ तीन गुरे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचे काही नागरिकांनी पहिल्या नंतर हे काम गुरे चोरणाऱ्या टोळीचेच असल्याची खात्री झाली. दरम्यान नागोठणे येथील पशु वैदकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्या तीन गुरांवर औषोधोपचार करुन शुद्धीवर आणले.
याबाबत नागोठणे हिंदू जनजागृती मंचाचे पदाधिकारी गोवर्धनभाई पोलसानी, बापूमहाराज रावकर, किशोरभाई म्हात्रे, मनोज धात्रक, मंदार चितळे, चेतन कामथे, निलेश भोपी आदींनी नागोठणे पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून सदर झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
या घटनेबाबत नागोठण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांची भेट घेतला असता त्यांनी सांगितले की, आमच्या पोलिसांकडून रोज रात्री काटेकोरपणे गस्त घालत असतो. तरी सुद्धा असे प्रकार घडत असतील तर आम्ही आजपासून गस्त वाढविण्यात येईल. तसेच नागोठणे ग्रामपंचायतीने नागोठण्यातील मुख्य चौकाचौकात चांगल्या प्रतीच्या सीसीटीव्ही कॅमे-यांची व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यास संबंधित आरोपीला जेरबंद करण्यास आम्हाला सीसीटीव्ही कॅमेराची मदत होईल. दरम्यान गुरे चोरणा-या टोळीला जेरबंद करण्यात नागोठणे पोलिस यशस्वी होतील का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.







Be First to Comment