Press "Enter" to skip to content

खळबळजनक : उरणमध्ये शालेय पोषण आहाराचा घोटाळा

कोरोनाच्या महामारीमुळे शाळा सुरू नसतानाही शंभर टक्के शालेय पोषण आहाराचे कागदोपत्री वाटप 🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । 🔷🔶🔷

शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रकृतीसाठी शालेय पोषण आहार सुरू केला आहे. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे शाळा सुरू नसतानाही शंभर टक्के शालेय पोषण आहाराचे वाटप कागदोपत्री होतो मात्र प्रत्यक्षात यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे. हा घोटाळा करून शिक्षकवर्ग मालामाल झाल्याचा आरोप पालक वर्गाकडून होत आहे. तरी याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

विद्यार्थ्यांची प्रकृती सदृढ राहण्यासाठी शालेय पोषण आहाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्व ठप्प झाल्याने अनेक पालक वर्ग सकुटूंबासह गावाला गेले होते. आता काही दिवसांपासून व्यवसाय सुरू झाल्याने पालक पुन्हा कामासाठी परतले आहेत. परंतु पाल्य अजूनही गावाला आहेत. गेली सात ते आठ महिने शाळा बंद आहेत. परंतु शासनाने पोषण आहार घरोघरी वाटपाचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार उरणमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. शिक्षक वर्गाकडून पोषण आहाराचे वाटप कागदोपत्री सुरळीत सुरू आहे. मात्र याबाबत आमच्या प्रतिनिधींनी काही ठिकाणी जाऊन याची शहानिशा केली असता बहुतांश पाल्य हे परगावातले असल्याने ते शाळा बंद असल्याने अजून पर्यंत गावीच वास्तव्य करून आहेत. असे असताना त्यांच्या वाट्याचा पोषण आहार जातो कुठे हे गुलदस्त्यातच आहे. मात्र कागदोपत्री पोषण सुरळीत वाटप होत असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत गटशिक्षणाधिकारी दीपा परब यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी शिक्षकांकडून पोषण आहार सुरळीत वाटप कागदोपत्री होत असल्याचे सांगितले. परंतु पोषण आहाराचे वाटप केल्याचे कोणते फोटोग्राफ आहेत का, याची विचारणा केली असता नाही असे सांगितले. परंतु काही पालक वर्गांनी आमचा पाल्य गावाकडे असतानाही त्याचा पोषण आहार अनेक महिने न मिळता जातो कुठे असा सवाल केला. याची विचारणा केली असता आम्ही याची तपासणी करतो असे परब मॅडमनी सांगितले.

कोरोनाच्या महामारी संकटामुळे उरणमधील शाळा बंद आहेत. मात्र शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांना घरोघरी देण्याचे आदेश आहेत. याचाच फायदा शिक्षकवर्ग उचलत कागदोपत्री पोषण आहार सुरळीत वाटप सुरू
असल्याचे वरिष्ठांना दाखवित त्यांची एक प्रकारे फसवणूक करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कोरोनामुळे विद्यार्थी गावाला असतानाही त्याच्या वाट्याचा पोषण आहार नक्की जातो कुठे हे गुलदस्त्यातच आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

यामुळे शिक्षक वर्गाकडून शालेय पोषण आहाराचा घोटाळा होत असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. तरी गटशिक्षणाधिकारी दीपा परब यांनी उरणमधील विद्यार्थ्यांची पट संख्या लक्षात घेत त्याप्रमाणे पोषण आहाराचे वाटप होते की नाही याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पालक वर्गाकडून जोर धरू लागली आहे. जर शालेय पोषण आहाराचे वाटप व्यवस्थित होत नसेल तर त्याची आपण चौकशी करू असे गटशिक्षाणिकारी दीपा परब यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.