Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एक गंभीर जखमी


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷


कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा नागरिकांना खूप त्रास होत आहे. आज सकाळी मॉर्निग वॉक करताना एकावर कुत्र्यांनी हल्ला केला. तो हल्ला परतवताना तो रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी पनवेलला हलविण्यात आले आहे.

कर्जतच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कपड्याचे दुकान असलेले अभय बाफना ( वय-58 ) नेहमी प्रमाणे सकाळी साडे सहा वाजता मॉर्निंग वॉक साठी घरून निघाले. शहरातील नगरपरिषद कार्यालया समोर काही भटके कुत्रे फिरत होते. बाफना समोर आल्याबरोबर त्यातील काही कुत्रे त्यांच्या अंगावर आले. त्यांच्या हल्ल्यापासून वाचण्याच्या गडबडीत ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि कानातून तसेच नाकातून रक्त येऊ लागले. त्याचवेळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या अन्य नागरिकांनी त्यांना कर्जत उप जिल्हा रुग्णालयात नेले.

ही घटना त्यांच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी बाफना यांना पनवेल येथे उपचारा साठी हलविले. शहरात भटक्या कुत्र्याचा त्रास वाढला असून दोनच दिवसांपूर्वी मुद्रे बुद्रुक मधील विजय बैलमारे यांनाही एक भटके कुत्रे कडकडून चावले होते. भटक्या कुत्र्यांचा व मोकाट गुरांचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यांचा बंदोबस्त नगरपरिषद प्रशासनाने करावा अशी मागणी नागरिकां कडून होत आहे.

‘पूर्वी ग्रामपंचायत व त्यानंतर नगरपरिषद झाली तरीही मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा होता. आता तो अस्तित्वात नाही. शहरभर मोकाट गुरे फिरत असतात. त्यामुळे अपघात होतात. पूर्वी भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त व्हायचा आता पुन्हा कुत्र्यांचा व गुरांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शाळा सुरू झाल्यावर लहान मुलांना कुत्र्यांपासून धोका होऊ शकतो.’

—– रणजित जैन, सदस्य, रायगड जिल्हा शांतता समिती

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.