सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷
यंदा भात पिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आणि पावसाने दगा दिला त्यामुळे भाताची रोपे सुकली. आता हा हंगाम गेला या विवंचनेत शेतकरी वर्ग होता मात्र खचून न जाता एका प्रगतशील शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी वापरलेली जूनी कल्पना पुन्हा वापरून भात बियाणाचे रोव तयार करून पेर भात पद्धतीने पेरणी करून भात पिक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला.
भात पीक घ्यायला मजुरांची समस्या भेडसावत असते परंतु या पद्धतीमुळे ती समस्याही निकालात निघाली आहे. तसेच बियाणे सुद्धा वाचले आहे. आता भरघोस भात पिक तयार झाले आहे. यंदा पारंपारिक पद्धतीने केलेल्या पेरण्या पावसाने दडी मारल्याने थोडीशी वर आलेली भाताची रोपे सुकून गेली तर काही ठिकाणी लावणी योग्य पाणी शेतात नसल्याने लावणी होऊ शकली नाही.
पाऊस बराच लांबला त्यामुळे यंदाचे पीक हातचे जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. काहींनी जमिनी न लावता ओसाड ठेवल्या. या सर्वावर मात केली ती कोषाणे गावातील प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र तातू ठोंबरे यांनी. ठोंबरे यांनी आपल्या जमिनीवर भात पेरले.
ठोंबरे पाच दिवसांनी शेतावर गेले तर सकाळी पेरलेल्या जमिनीतून भात रोपे वर आली होती. त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने ही रोपे सुकू लागली. ठोंबरे यांना काय करावे कळेना ? त्या रात्री त्यांना झोप लागत नव्हती विचार करून अक्षरशः डोके गरगरू लागले आणि एकदम त्यांना दोन वर्षापूर्वी केलेला प्रयोग आठवला. त्यावेळी खेकडांनी सर्वच्या सर्व भात रोपे फस्त केली होती. त्यावर कल्पना लढवून भात बियाणाचा रोव करून त्यात फोरेट हे जालीम कीटक नाशक मिसळून ते पेरले आणि भात शेती तारली गेली. पण त्यावेळी क्षेत्र कमी होते. तरीही त्यांनी सकाळी तो प्रयोग करण्याचा निर्णय पक्का केला.
त्यांनी सकाळी चाळीस किलो भात बियाणे पाण्यात भिजत घातले. दुसऱ्या दिवशी ते पाण्यातून काढले व पोत्यात भरले. तिसऱ्या दिवशी मोड आले या पद्धतीला ग्रामीण भागात 'रोव' असे म्हणतात. मात्र दोन वर्षापूर्वी केलेला प्रयोग जास्त क्षेत्र असल्याने यशस्वी होईल का ? अशी संशयाची पाल चुकचुकत होती मात्र सर्व विचार बाजूला ठेऊन तयार झालेला रोव फोरेट कीटक नाशकात मिसळले आणि आपल्या भरत या मुलाला बरोबर घेऊन त्यांनी आपली जमीन पेरली.
फोरेट वापरल्याने खेकडे किंवा पक्षी त्या परिसरात फिरकले नाहीत आणि जोमदार भात रोपे सहा - सात दिवसातच बाहेर आली. त्यामुळे ठोंबरे यांच्या ओठावर हासू आले. ठोंबरे यांची कल्पना पुन्हा एकदा यशस्वी झाली आणि त्यांच्या शिवारात कधी नव्हे इतके भरघोस पिक डोलू लागले. पावसाची मनमानी सुरूच होती. कधी मुसळधार तर कधी आठ - आठ दिवस दांडी असा बेभरवशाचा पाऊस पडला तरी त्यांच्या पिकाला धोका झाला नाही उलट विक्रमी उत्पादन हाती आले आहे. यापद्धतीने भात पीक घेतल्यास मजुरांची समस्या भेडसावत नाही. शिवाय एका एकरला फक्त आठ किलो भात बियाणे लागते. शेतकरी स्वतः पेरणी करून भात पीक घेऊ शकतो.







Be First to Comment