बौद्ध स्थापत्येत कोरलेल्या लेणीच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचा पुढाकार 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था गेल्या 12 वर्षापासून गडकिल्ले संवर्धन यासाठी महाराष्ट्रभर कार्य करत असून आतापर्यंत संस्थेने महाराष्ट्रातील विविध किल्यांवर 1000 हून अधिक स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमा केंद्र पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभागाच्या संरक्षित असलेल्या किल्यांवर आणि ऐतिहासिक स्मारके यांचे जतन आणि संवर्धनाचे काम करत आहे.
थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी – महाराष्ट्रात बौद्ध,जैन,हिंदू या धर्मांच्या-पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतात. लेण्या म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच आहेत. इ.स.पू. दुसरे शतक ते इ.स. आठवे शतक या काळात महाराष्ट्रात लेणी निर्माण करण्यात आल्या. उदा. अजिंठा आणि वेरुळ(संभाजी नगर) त्यानंतर महाराष्ट्रात सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्र्कृट अश्या विविध राजवटीचा काळात राजघराण्यातील व्यक्ती,व्यापारी, भिक्षु,सामान्य नागरिक यांनी लेणी दान दिल्याचे आढळते. भारतात असलेल्या हजार ते बाराशे लेणीपैकी 800 हून आधीक लेण्या या महाराष्ट्रात आहेत.
भारत व रोम यांमधील वाढत्या व्यापारामुळे तसेच बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे महाराष्ट्रात इसवी सन पहिले ते तिसरेशतक या काळात भाजे, अजिंठा, पितळखोरा, काल्रे, नाशिक, जुन्नर, कुडा, कान्हेरी, महाड इत्यादी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर लयननिर्मिती झाली. इसवी सनाच्या चौथ्या व पाचव्या शतकात वाकाटक राजे आणि त्यांचे मंत्री यांच्या आश्रयाने अजिंठा येथील बौद्ध लयननिर्मितीचा दुसरा टप्पा पार पडला.
प्राचीन काळी ‘श्रीहरी’ असे नाव असलेल्या सध्याच्या घारापुरी या बेटावर शैव संप्रदायाच्या लेणी आहेत. इ.स. 3 ते इ.स. 7 या काळात या लेणींची निर्मिती झाली असे मानले जाते. या लेणींमधील अकरा हात उंचीची तीन मुखे असलेली शिवाची मूर्ती जगातील भव्य आणि सुंदर अशा शिल्पांपैकी एक समजली जाते. अर्धनारीनटेश्वराची मूर्तीदेखील या ठिकाणी बघायला मिळते. लेणी आणि शिलालेख हे महाराष्ट्राच्या तत्कालीन आर्थिक, सामाजिक,धार्मिक आणि राजकीय इतिहासाचा पट आपल्यासमोर ठेवतात.
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध घारापुरी, गंधारपाले लेणी,कुडा लेणी,कोंडाणा लेणी,ठाणाळे लेणी,नादसूर लेणी, नेनावली लेणी अश्या लेण्यांकडे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. तसेच आणखी लहान लहान लेण्या आहेत त्यातील काही अर्धवट कोरल्या आहेत असे लेण्या हि रायगड जिल्ह्यात आढळतात मात्र काळाच्या ओघात प्रसिद्धी आणि पर्यटकांपासून लांबच आहेत. त्या लेण्या उजेडात येऊन पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्व वाढावे या करीता सह्याद्री प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे.

रायगड जिल्ह्यातील ता.खालापूर येथील हाळ खुर्द गावातील डोंगरात बौद्ध स्थापत्य कोरलेली लेणी आहे. या लेणी शेजारी पाण्याची टाकी 10 X 9 लांबी रुंदी असलेली असून ती मातीने बुजली आहे. तसेच तीस फुट अंतरावर हि कातळात कोरलेली लेणी आहे लेणीत सहा खोल्या असून अनुक्रमे 7.5 x 7.5, 7.5 x 5.10, 7.2 x7.1, 7.2 x7.3, 7.5 x5.7, 7.5 x 5.2लांबी रुंदी अशी आहे. या प्रत्येक खोल्यामंध्ये कोरीव बाक कबण्या दरवाजे आणि दर्शनी भागाच्या बाहेरील बाजुस खिडकी आहे.
या लेणीमध्ये फक्त खोल्या कोरल्या असून कोणतेही शिलालेख किंवा शिल्प तेथे आढळत नाही. या डोंगराला लागून नैसर्गिक भुयार हि आहे ते प्राचीन काळातील असावे असे स्थानिकांचे मत आहे.
ही लेणी पर्यटकांपासून दुर्लक्षित असून येथे पर्यटक येत नाही. जास्तीत जास्त पर्यटकांनी या लेणीला भेट द्यावी हा आमचा उद्देश आहे. या लेणीचे संवर्धन व्हावे तसेच खालापूर तालुक्यातील ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान खालापूर विभागाकडून लेणीचीपाहणी करण्यात आली असून या लेणीचे संवर्धन करण्याचे खालापूर विभागाने ठरविले आहे. या लेणीचा उल्लेख रायगड जिल्हा गॅझेटीअर मध्ये हि उल्लेख आढळतो.
संस्थेच्या दुर्ग संवर्धन विभागाकडून या लेण्या संरक्षित स्मारक करण्यात यावे म्हणून शासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला असून स्थानिक ग्रामपंचायत यांना पत्र देण्यात आले त्यांनी हि या कार्यास सहमती दर्शवून ते सहकार्य करणार आहेत. असे मत गणेश रघुवीर (अध्यक्ष-दुर्ग संवर्धन विभाग) यांनी व्यक्त केले.

या लेण्याच्या संवर्धनामुळे हाळ खुर्द गावात तसेच खालापूर तालुक्यातील पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळच असलेल्या महड अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्रला लाखो पर्यटक भेट देतात ते या लेणीला हि भेट देऊ शकतील. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांना रोजगार हि लाभेल. सह्याद्री प्रतिष्ठान खालापूर विभागाकडून लवकरच लेण्यांच्या संवर्धना करिता पाण्याची टाकी स्वच्छता तसेच लेण्यापर्यंतच्या मार्गावर दिशा दर्शक फलक आणि सूचना फलक लावण्यात येतील अशी माहिती श्री समीर घोसाळकर आणि श्री प्रीतेश तटकरे(उपाध्यक्ष-खालापूर विभाग) यांनी दिली. या लेणीच्या अभ्यास भ्रमंतीत श्री विकास शिवाजी चव्हाण,दीपक जोगळे,अर्पिनंदन गायकर प्रीतेश तटकरे,समीर घोसाळकर आणि गणेश रघुवीर यांचा समावेश होता.
लेणीकडे पोहोचण्याचा मार्ग – 1)मुंबई सेन्ट्रल ते महड फाटा 79 किमी—महड फाटा ते खालापूर 2 किमी-खालापूर ते हाळ खुर्द गाव 4.6 किमी.
2) पुणे ते खोपोली 79 किमी –खोपोली ते हाळ खुर्द गाव 3.4 किमी. असा मार्ग असून हाळ खुर्द गावातून लेणीकडे पोहोचण्यासाठी 40 मिनिटे लागता पावसाळ्यात वाटाड्या घ्यावा तर उन्हाळ्यात थोडा उभा चढ असून पाणी सोबत असावे.







Be First to Comment