पोलादपूर शहरात माकडांच्या तर तालुक्यात रानडुकरांच्या बंदोबस्ताची गरज 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔶
शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून माकडांचा उच्छाद वाढला असून तालुक्यात भातपिक हाताशी येत असताना रानडुकरांच्या झुंडी वाढत आहेत. पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून नियंत्रण ठेवल्यानंतरही शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या आठवडाभरात कुत्रीची पिल्लं आढळून आल्याने निर्बिजीकरणाच्या खर्चाच्या फलश्रृतीबाबत शंका निर्माण झाली आहे.
पोलादपूर शहरामध्ये 2006 पासून माकडांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. पुर्वी पोलादपूर तहसिल कार्यालयासमोर जप्त करून उभा करण्यात आलेल्या एका तांदळाच्या टेम्पोमध्ये तांदूळ खाण्यासाठी माकडांची कुटूंब गोळा झालेली दिसून येत असताना काही कालावधीनंतर तो टेम्पो मूळ मालकाने ताब्यात घेतल्याने ही माकडांची कुटूंबं पोलादपूर शहरातील विविध लोकवस्त्यांमध्ये मुक्त संचार करून नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास देऊ लागली आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी पिसाळलेल्या माकडांनी महिलांना चावे घेतल्याच्या घटना झाल्या असताना वनविभागाकडून या घटनांची गांभिर्याने दखल घेतली गेली नाही.

गेल्यावर्षी शेतात भातपिक हाती येण्याच्या सुमारास रानडुकरांनी दिविल भागातील एका शेतकरी कुटूंबावर हल्ला करून जखमी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारे वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त केला नाही. परिणामी, पोलादपूर तालुक्यात रानडुकरांपासून भातपिकाचे रक्षण करण्यासाठी रात्री पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली असताना रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे हत्यार बाळगून केलेल्या प्रतिकारात रानडुकर मेल्यास शिकारीचा गुन्हादेखील शेतकऱ्यांविरूध्द नोंदण्यात येण्याच्या शक्यतेने कोणी असा प्रतिकार अथवा बंदोबस्त करण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेताची नासधूस होऊन मोठया प्रमाणात नुकसानही होत असल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर तालुक्यातील वनविभागाने पोलादपूर शहरातील माकडांचा आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले नाही तर पिकांच्या संरक्षणाच्या प्रयत्नात शेतकऱ्यांवर हकनाक शिकारीचे गुन्हे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्याच वर्षी पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम मोठया प्रमाणात राबवूनही सध्या शहरातील रस्त्यांवर कुत्रीची नवजात पिल्ले ठिकठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे निर्बिजीकरणाच्या मोहिमेचा खर्च वाया गेला अथवा कसे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. दुसरीकडे, शहरातील माकडांच्या माद्यांचाही विण्याचा काळ जवळ आला असल्याने यंदा माकडांच्या संख्येत वाढ होण्याची लक्षणे दिसून येत आहेत तर ग्रामीण भागात झुंडीने वावरणाऱ्या रानडुकरांच्या माद्याही विण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून भातपिकांसह कंदमुळे आणि अन्य भूमीउपज मोठया प्रमाणात फस्त केले जात आहे. यामुळे पोलादपूर वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.








Be First to Comment