

पनवेल दि १४ (प्रतिनिधी):
भारतीय क्रिकेट जगताला रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांसारखे दिग्गज खेळाडू देणारे प्रख्यात क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ (Vocational Excellence Award 2026) देऊन गौरवण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल नितीन ढमाले आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिनेश लाड यांच्या योगदानाचा गौरव केला. ” दिनेश लाड याना मुंबईत प्रशिक्षणासाठी हक्काचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच वेळ मिळवून देऊ अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.
या सोहळ्यात पीडीजी डॉ. शैलेश पालेकर यांनी दिनेश लाड यांची घेतलेली प्रकट मुलाखत विशेष आकर्षण ठरली.
खलाशी ते द्रोणाचार्य: दिनेश लाड यांचा प्रेरक प्रवास
मुलाखतीदरम्यान दिनेश लाड यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला:
नोकरीचा प्रवास: कोलगेट कंपनीपासून नोकरीची सुरुवात केल्यानंतर त्यांनी रेल्वेत खलाशी आणि नंतर लिपिक (क्लार्क) म्हणून काम केले. पुढे प्रवीण आमरे यांच्या हस्ते शाळेत कोचिंगची सुरुवात केली.
गुरूंचा वारसा: “गुरूवर्य रमाकांत आचरेकर यांनी मला पांढरा ड्रेस आणि शूज दिले. ते केवळ माझे गुरू नसून माझे सर्वस्व आहेत,” अशा शब्दांत त्यांनी लाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली. १९९० मध्ये आचरेकर सरांना मिळालेल्या सन्मानानंतर तब्बल ३२ वर्षांनी मला हा गौरव मिळाला असल्याचे लाड यांनी यावेळी सांगितले
विनामूल्य प्रशिक्षण:
दिनेश लाड यांनी कधीही कोणत्याही खेळाडूकडून प्रशिक्षण शुल्क (Fees) घेतले नाही. पालघरहून आलेल्या शार्दूल ठाकूरला राहण्यापासून प्रशिक्षणापर्यंत साथ दिली, तर आतिफ अत्तरवाला याला तब्बल ५ वर्षे आपल्या घरी ठेवून घडवले. असल्याचे सांगितले
फाउंडेशनचा उपक्रम: सध्या त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून २६ गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत क्रिकेट प्रशिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले असल्याचे आपल्या मुलाखतीत सांगितले
.
रोहित शर्माबाबत मोठा विश्वास: “२०२७ चा वर्ल्ड कप रोहित खेळणारच!”
रोहित शर्माच्या बालपणाविषयी बोलताना लाड सर म्हणाले:
“शालेय सामन्यादरम्यान मी रोहितची बॉलिंग स्टाइल पाहून प्रभावित झालो. त्याला आमच्या शाळेत फ्री-शिप (मोफत प्रवेश) मिळवून दिली. रोहितला प्रोत्साहन दिले. २००९ ते २०११ दरम्यान तो संघात निवडला गेला नव्हता, तेव्हा मी त्याला मेहनतीची जाणीव करून दिली आणि त्याने कठोर परिश्रम करून पुनरागमन केले.”
तसेच, “रोहित शर्मा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक (World Cup) नक्की खेळणार,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी दिनेश लाड यांनी व्यक्त केला.
क्रिकेट विश्वावर रोखठोक मत
सर्वोत्तम खेळाडू: सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेत.
T-20 आणि युवा खेळाडू: “मी टी-२० ला खरा क्रिकेट मानत नाही. वैभव सूर्यवंशी हा उत्तम फलंदाज आहे, पण त्याला रेड बॉल क्रिकेट (कसोटी) मध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल,” असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रांतपाल नितीन ढमाले यांनीही लाड सरांच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले.
या सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे पीडीजी डॉ. गिरीश गुणे, डॉ. दीपक पुरोहित, डॉ. हळदीपुरकर, मंजू फडके, डीजीएन विवेक दीक्षित, रो. नितीन मुळे, रो. उज्ज्वल केले, रो. जिग्नेश पंड्या, सर्व असिस्टंट गव्हर्नर (AG), विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि रोटेरियन्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. धनी तन्ना यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जयश्री पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धी प्रमुख रो. प्रशांत माने यांनी दिली.


Be First to Comment