

पेण, ता. १३ (वार्ताहर) : स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस अगोदरच देशभर राष्ट्रभक्तीचा जोश आणि देशप्रेमाची भावना जनसामान्यात जागृत राहावी हाच उद्देश केंद्र शासनाने ठेवून सर्वत्र तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने आज पेण नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी, माजी सैनिक तसेच हजारो नागरिक सहभागी झाले असून सदर तिरंगा रॅलीने राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रितम पाटील म्हणाल्या की देशाचे क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, आणि भारतीय सैनिक यांना सलाम करण्यासाठीच या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने यामध्ये युवा पिढी देशप्रेमात उत्साही आणि आनंदी झाल्याचे दिसून आल्याने हीच खरी देशभक्ती आहे आपल्या समृद्ध देशातील सर्व जाती धर्मांना एकत्र आणणारा धागा म्हणजे आपल्या देशाचा तिरंगा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.या रॅलीमध्ये आमदार रविंद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी जिवन पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, जिप.सभापती वैकुंठ पाटील, सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंस.सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, माजी जिप.अध्यक्षा निलिमा पाटील, युवा नेते ललित पाटील आदिंसह पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी उपस्थित होते.
सदर रॅलीमध्ये भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या तर रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी भारतमाता, झाशीची राणी, स्वातंत्र्य सैनिक, महात्मा गांधी यांसह देशासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या वीर पुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या.



Be First to Comment