Press "Enter" to skip to content

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

10 ऑक्टोबर चा राज्यव्यापी बंद लक्षवेधी व निर्णायक ठरेल  : वंदनाताई मोरे 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

मराठा आरक्षण हा अत्यंत ज्वलंत व  जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी समाजबांधवांनी व्यापक स्वरूपाचा  संघर्ष व लढा दिला.  सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आले नाही.  त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष पसरला असून आपल्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी येत्या 10 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या बंदला सर्व स्थरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून या हक्काच्या लढ्यात सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन ताराराणी ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे यांनी केले आहे.

मराठा आरक्षण काळाची गरज आहे. आरक्षण रखडल्याने  2021 च्या सर्व नोकर भरती व शैक्षणिक सवलतीमध्ये  मराठा समाजातील मुला-मुलींना आरक्षणाचा कोणताही लाभ घेता येणार नाही.  त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड उद्रेक व असंतोष निर्माण झाला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण व इतर प्रमुख मागण्यासाठी 10 ऑक्‍टोबर रोजी होणारा बंद ऐतिहासिक व निर्णायक ठरेल. असे शिवमती मोरे म्हणाल्या. समाजातील पुढच्या पिढीची प्रगती होण्यासाठी आरक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. महागडी शैक्षणिक फी परवडत नसल्याने समाजातील अनेक मुले इंजिनीअरिंग, वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे.

मराठा समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आयोजीत महाराष्ट्र बंद यशस्वी करावा अशी घोषणा कोल्हापूर येथे झालेल्या गोलमेज परिषदेमध्ये करण्यात आल्याची माहिती  ताराराणी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष शिवमती वंदना ताई मोरे यांनी दिली.   

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाचा लढा कित्येक वर्षे चालू आहे. देशामध्ये विविध भागांमध्ये मराठा संघटना एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिनांक 09 /09 2020 रोजी अंतरिम स्थगिती दिली.  अशातच महाराष्ट्र सरकारने नोकर भरती जाहीर करून सामाजिक भावना दुखावल्या आहेत.

दिनांक 23/ 09/ 2020 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यातील प्रमुख मराठा संघटनेचे गोलमेज परिषदेमध्ये मराठा समाजाचे प्रमुख ठराव घोषित करण्यात आले या मराठ्यांच्या निर्णयासाठी शासन निर्णय घेण्यात चालढकल करते हे असे निदर्शनास येत असल्यामुळे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याचे प्रतिपादन शिवमती मोरे यांनी केले आहे. आरक्षण नसल्याने मराठा समाजाचा सर्वांगीण विकास झालेला नाही. 

आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे,  लाखोच्या संख्येने मूक मोर्चे निघाले. दुसऱ्या समाजाचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी अजिबात मागणी नाही. इतर समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण दिले आहे, त्याप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे. सरकारने कोर्टात आरक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व पुरावे देऊन ठोस भूमिका घ्यावी. त्यातून मार्ग काढून लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे.

मराठा समाजाने आजवर कोणावरही अन्याय केला नाही, कोणाच्याही आरक्षणात विरोध व  घुसखोरी केली नाही,  म्हणूनच इतर समाजाने देखील मराठा समाजाला पाठिंबा दिला आहे.  या महाराष्ट्र बंद साठी व्यापारी वर्गाचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.  महाराष्ट्र बंद राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे करावा लागत असून सर्व बंदची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहील असा रोखठोक इशारा वंदनाताई मोरे यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.