सरपंचांनी आरोप फेटाळला 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
नागोठणे जवळील वांगणी ग्रामपंचायत हद्दीत सन २०१८, २०१९ व २०२० या आर्थिक वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये अपहार झाला असल्याचा तक्रार अर्ज आमडोशी ग्रामस्थ प्रकाश रेवाळे, जयराम जांबेकर, गणेश जाधव व रोशन जांबेकर यांनी रोहा प. स. चे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्याकडे दिला आहे.
दरम्यान ग्रामस्थांनी केलेले विविध विषयांवरील आरोप बिनबुडाचे असून त्यात काहीही तथ्य नसून आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नसल्याने कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर चौकशीस आम्ही तयार आहोत असा खुलासा वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सोनम संजय भोसले व रोहा पं. स. सदस्य संजय भोसले यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या तक्रारी अर्जात आमडोशी ग्रामस्थांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने एका कामाचे दोन दोन अंदाजपत्रक व दोन दोन मुल्यांकन दाखविले आहेत, कामांची लांबी, रुंदी, उंची यामध्ये फार मोठी तफावत आहे. सुप्रीम कंपनीच्या सीएसआर फंडामार्फत गावात शौचालय झालेले आहेत परंतु वनखात्याचे कारण सांगून काही ठिकाणी शौचालय बांधले नाहीत, ग्रामपंचायतने कामे न करता पैसे काढलेले आहेत, ग्रामपंचायतीने त्यांच्या वार्षिक उत्पनातून १५ टक्के मागासवर्गीय निधीतून मागासवर्गीयांना व ३ टक्के निधीतून अपंगांना मदत केलेली नाही, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत ठेकेदारास पेमेंट अदा करण्यात आले आहे असे अनेक आरोप तक्रारदार प्रकाश रेवाळे, जयराम जांबेकर, गणेश जाधव, रोशन जांबेकर आदी ग्रामस्थांनी रोहा पं. स. चे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात केले आहेत.
दरम्यान वरील सर्व आरोप फेटाळत रोहा पं. स. सदस्य संजय भोसले व सरपंच सौ. सोनम भोसले यांनी सांगितले की, तक्रार अर्जात दिलेली सर्व माहिती चुकीची असून अंदाजपत्रक हे पं. स. चे इंजिनिअर देत असतात. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कामे ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन नियमा नुसार करण्यात आली आहेत. सीएसआर फंड कंपनीकडून देण्यात येत असतो. कंपनी व ग्रामपंचायत दोन्ही वेगळे वेगळे भाग आहेत.
ग्रामपंचायत कंपनीस जागा उपलब्ध करून देत असते. ज्या ठिकाणी वनखात्याची जागा असेल तेथे कुठलेली बांधकाम करता येत नाही. ग्रामपंचायत हद्दीत आम्ही २१० शौचालये बांधलेली आहेत. कामे न करता पैसे काढूच शकत नाहीत. ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पनातून अपंगांना ३ टक्के मदत निधी व मागासवर्गीयांना १५ टक्के मदत निधी दिला जातो त्याप्रमाणे आम्ही अपंग व मागासवर्गीय यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. तक्रारदारांनी ते तपासून घ्यावेत.
ग्रामपंचायत हद्दीत अपंग ३२ व्यक्ती व मागासवर्गीय १२० व्यक्ती आहेत. याबाबत अपंग व मागासवर्गीयांनी तक्रार केली पाहिजे होती पण त्यांच्या बँक खात्यात संबंधित रक्कम जमा झाली असल्याने तसे होण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ७ ते ८ महिन्याआधी ठेकेदाराच्या पेमेंट संदर्भात मासिक मिटिंग मध्ये ठराव झालेला होता त्यामुळे जुन्या कामांचे पेमेंट देण्यात आले आणि हे कामे पंचायत समिती व जिल्हापरिषद फंडातून करण्यात आले आहेत .तसेच कोरोना महामारीच्या या कालावधी मी माझ्या स्वखर्चाने ७० हजार रुपयांचे सॅनिटायझर व मास्क वाटप केले असल्याचे शेवटी पं. स. सदस्य संजय भोसले यांनी सांगितले.







Be First to Comment