सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔶🔷
मानवाच्या मूलभूत गरजा ह्या अन्न,वस्त्र आणि निवारा असताना पोटाची खळगी भरण्यासाठी सफाईची घाणीची कामे करून अन्न अन वस्त्र तर मिळतो आहे परंतु नगरपरिषदेच्या वर्षोनुवर्षे जुन्या लहानशा खोल्यात राहून साध्या निवाऱ्यासाठी या कामगारांची खूपच परवड होत असल्याने माथेरान नगरपरिषदे मधील सफाई कामगार आजही निवाऱ्यापासून उपेक्षित असून उत्तम दर्जाच्या निवाऱ्याची सोय नगरपरिषदेने लवकरात लवकर करावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून ते करीत आहेत.
नगरपरिषदेने जवळपास चाळीस वर्षांपूर्वी सफाई कामगारांसाठी वाल्मिकी नगर भागात दोन चाळी बांधल्या आहेत.
त्यामध्ये तीन वर्षांपूर्वी एका चाळीचे नूतनीकरण करण्यात आले होते परंतु ज्या पद्धतीने काम व्हायला अपेक्षित होते तसे केले गेले नाही.जुन्या बांधकामातील विटा काढून पुन्हा बसविण्यात आल्या होत्या तर खोलीतील शौचालयावर पूर्ण बांधकाम न केल्यामुळे घरात दुर्गंधी पसरलेली आहे .
मागील बाजूस सुध्दा चाळीचा जोत्याला तडे गेल्यामुळे केव्हा पडेल याची शाश्वती नाही त्यामुळे जेवण करताना त्यांना असह्य होत असते.त्यातच हे सफाई कामगार कसेबसे आपले जीवन जगत आहेत. एकंदरीत कामाचा दर्जाच लोकप्रतिनिधींच्या संबंधित मर्जीतील ठेकेदाराने खालावलेला आहे.त्याचा त्रास नाहक हे कामगार सहन करीत आहेत.
तर वरील बाजूस सुध्दा एक खूपच जूनी चाळ असून खूपच अरुंद खोल्या आहेत छोटेसे किचन आणि एक लहानशी खोली यामध्ये हे सफाई कामगार आपल्या कुटुंबासह दिवस कंठीत आहेत.दरवाजे सुध्दा खूपच लहान असल्याने एखादी खुर्ची अथवा कपाट कसेबसे आत जाऊ शकते एवढे अरुंद दरवाजे आहेत.भिंती आणि लाकडे फारच जुनी झालेली असल्याने एखाद्या नैसर्गिक आपत्ती काळात खूपच धोकादायक बनलेले आहेत.
लवकरच ह्या चाळीचे नूतनीकरण करावे,आम्ही सुध्दा माणसे आहोत आम्हाला सुध्दा माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे असे तेथील सफाई कामगार पोटतिडकीने बोलत आहेत.
पहाटे पासून सफाई कामगार हा उन्हातान्हात तर पावसाळ्यात सुध्दा आपले काम नित्यनेमाने करीत असतात.शौचालय साफ करणे तसेच दुर्गंधी असलेल्या गटारात उतरून घाण साफ करणे अशी कामे त्यांना करावी लागतात आजवर स्वच्छता अभियान मध्ये अनेक पुरस्कार नगरपरिषदेला प्राप्त झाले आहेत त्यात या सफाई कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. खरे स्वच्छता दूत हा सफाई कामगार आहे त्याच्या निवाऱ्याची सोय नगरपरिषदेने करणे गरजेचे आहे परंतु दोन पिढया झाल्या तरीसुद्धा ह्या कामगारांबाबतीत कुणीही सकारात्मक विचार करत नाहीत. लवकरच एखाद्या परवानाधारक ठेकेदारांकडुन ह्या चाळींच्या नूतनिकरणाची कामे पूर्ण करावीत.
संतोष लखन — अध्यक्ष अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर काँग्रेस संघटना माथेरान








Be First to Comment