मुख्यमंत्र्यांकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिध्द आहे. त्याकाळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती. तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता. आजही हा द्रोणागिरी किल्ला अस्तित्वात आहे. विषेश म्हणजे कोणत्याही ऋतूत एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटा आणि सुंदर असा ट्रेक म्हणूनही प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी अनेक भागातील भक्तगण येत असतात. परंतु आता हा ढासळत चालला आहे. तरी याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या किल्ल्याची जपवणूक करावी अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
सातवाहनांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख होळे येथील शिलालेखात आहे. घारापूरी या राजधानी पासून जवळ असणार्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे.
द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.1530 मध्येपोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. 1535 मध्ये काही चर्चेस बांधली. 16 व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला. मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा डोंगरावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. 10 मार्च 1739 ला कान्होजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला.
परंतु या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. याकडे लक्ष देत त्याची दुरुस्ती त्वरित करून द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व अबाधीत राखावे.

ओएनजीसी हा देशातील उद्योगधंद्यांना इंधन पुवणारा हा प्रकल्प या द्रोणागीरीच्या कुशीत बसवलेला आहे .या प्रकल्पाचे संरक्षण सहज करणे द्रोणागीरी शिखरावरून शक्य आहे म्हणून ओएनजीसी प्रकल्प शासनाने इथे असलेल्या पौराणिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या ह्या किल्याचे जतन होणे आणि करणे अत्यावश्यकच आहे.

मोठ्याप्रमाणात ओएनजीसी मधून सोडला जाणारा टाकाऊ गॅस जाळला जातो. प्रकल्पातून बाहेर निघणारा वायू ह्या पासून द्रोणागीरीच्या असलेले मोठ मोठे वृक्ष स्थानीक जनतेचे संरक्षण करतात. पर्यावरणाच्या दृष्टीने देखिल हा पर्वत अत्यंत महत्वाचा आहे. संजीवनी याच पर्वतावरून मारूतीरायाने लक्ष्मणासाठी मिळवली ही आख्यायिका आपणास ठाऊकच आहे. म्हणजेच औषधी वनस्पती देखील या पर्वतावर मोठ्या प्रमाणात आहेत.

या किल्ल्यावर गेल्यावर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर या किल्ल्यावर जाण्यासाठी दिवसेंदिवस ओढा वाढत चालला आहे. अंध व्यक्ती या किल्ल्यावर आले होते. दिवसेंदिवस या किल्ल्याचे महत्व वाढत चालले आहे. त्याची जपवणूक करणे महत्वाचे आहे. आपण मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुरातन गड किल्ल्याचे संवर्धन करण्याचा अतिशय चांगला असा निर्णय घेतलात.

या निर्णयाचे स्वागत करून आपण जातीने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्याची माहिती जाणून घेत त्याची दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उरण परिसरात द्रोणागिरी किल्ल्याच्या अत्यंत जवळ ओएनजीसी तसेच जेएनपीटी, बीपीसीएल, सिंगापूर पोर्ट, डीपीवर्ल्ड सारख्या कंपनी कार्यरत आहे. या कंपनीने सीआरएस फडातून द्रोणागिरी किल्ल्याची जपवणूक करण्यास हरकत नाही. तरी आपण या कामी पुढाकार घेऊन उरणमधील ढासळत चाललेल्या द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व जपावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उरण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे.








Be First to Comment