मार्कस स्टॉइनसची बेभान फटकेबाजी


मार्कस स्टॉइनसची बेभान फटकेबाजी आणि कागिसो रबाडासह सगळ्याच बॉलर्सनी केलेली शिस्तबद्ध बॉलिंग यांच्या बळावर दिल्लीने बंगळुरूला 59 रन्सनी नमवलं.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीने 6.4 ओव्हर्समध्ये 68 रन्सची सलामी दिली. मात्र नंतर दोघेही थोड्या अंतरात आऊट झाले.
पृथ्वीने 23 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांसह 42 रन्सची खेळी केली. शिखरने 28 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. मोईन अलीच्या बॉलिंगवर सिक्स मारण्याचा श्रेयस अय्यरचा प्रयत्न देवदत्त पड्डीकलच्या अफलातून कॅचमुळे संपुष्टात आला.
ऋषभ पंत आणि मार्कस स्टॉइनस जोडीने चौथ्या विकेटसाठी 46 बॉलमध्ये 89 रन्सची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ऋषभ ने 25 बॉलमध्ये 37 रन्सची खेळी केली.
स्टॉइनसने बंगळुरूच्या बॉलर्सचा खरपूस समाचार घेत 26 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 53 रन्सची खेळी करत मॅचचा नूर पालटला. दिल्लीने 196 धावांची मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना देवदत्त पड्डीकल, आरोन फिंच आणि एबी डीव्हिलियर्स चाळीसच्या आत परतल्याने कर्णधार कोहलीवर सगळी जबाबदारी येऊन पडली.
मोईन अलीही झटपट आऊट झाला. दिल्लीच्या बॉलर्सनी रन्स रोखल्या आणि विकेटही काढल्या.
श्रेयसने चतुराईने नेतृत्व करत कोहलीला माघारी धाडण्यासाठी रबाडाचं अस्त्र परजलं. चौथ्याच बॉलवर रबाडाने कोहलीला तंबूत धाडत मॅचचं पारडं दिल्लीच्या बाजूने झुकवलं. कोहलीने 39 बॉलमध्ये 43 रन्स केल्या.
कोहली आऊट झाल्यानंतर बंगळुरूच्या पुढच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली. रबाडाने 24 रन्सच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. अँनरिच नोकइया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
अक्षर पटेलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
अमित मिश्रा स्पर्धेबाहेर
दुखापतीमुळे अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.
दरम्यान पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी प्रयत्नशील दिल्ली कॅपिटल्स संघाकरता मिश्रा नसणं हा मोठा धक्का आहे. 37 वर्षीय मिश्रा हा दिल्ली संघाचा अविभाज्य भाग होता.
3 ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत स्वत:च्या बॉलिंगवर कॅच घेताना मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. बॉलिंग टाकण्याच्या उजव्या हातालाच ही दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याचं एक्सरे चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं.
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलच्या दीडशे मॅचेसमध्ये मिश्राच्या नावावर 160 विकेट्स आहेत.
स्पर्धेचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये अमित मिश्राचा समावेश होतो. आयपीएल स्पर्धेत तब्बल तीन हॅट्ट्रिकचा दुर्मीळ विक्रम मिश्राच्या नावावर आहे.
2008 मध्ये रवी तेजा, प्रग्यान ओझा, आरपी सिंग यांना आऊट करत त्यानं विक्रम केला होता. 2011 मध्ये रायन मॅकलरेन, मनदीप सिंग आणि रायन हॅरिस यांना आऊट करत धमाल उडवून दिली होती. 2013 मध्ये भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा आणि अशोक दिंडा यांना आऊट करत मिश्राने अनोखा विक्रम नावावर केला.
दिल्लीच्या ताफ्यात रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, संदीप लमाचीने, ललित यादव हे फिरकीपटू आहेत. मात्र तरीही त्यांना मिश्राची उणीव भासणार आहे. दिल्लीने अद्याप तरी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
यंदाच्या हंगामात चेन्नईविरुद्धच्या लढतीत मिश्राने 4 ओव्हर्समध्ये फक्त 23 रन्स दिल्या. हैदराबादविरुद्ध खेळताना मिश्राने 4 ओव्हर्समध्ये 35 रन्सच्या मोबदल्यात डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे या तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध बॅट्समनला आऊट केलं. कोलकाताविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त होण्याआधी मिश्राने 2 ओव्हर्समध्ये 14 रन्सच्या मोबदल्यात शुभमन गिलला आऊट केलं.
बॉलर्सची कत्तल होणाऱ्या या स्पर्धेत सलग तेरा हंगाम विकेट्स मिळवणं आणि धावांची लूट रोखणं हे काम मिश्राने समर्थपणे केलं आहे.
मिश्राने दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
मिश्राने 22 टेस्ट आणि 36 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हरयाणासाठी खेळताना मिश्राच्या नावावर 535 विकेट्स आहेत.
ट्वेन्टी-20 प्रकारात भल्याभल्या बॅट्समनना मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.
Be First to Comment