Press "Enter" to skip to content

चारफाटा ते भिसेगाव रेल्वे गेट रस्त्याचा वनवास संपणार कधी ?

मस्तवाल ठेकेदाराच्या भूमिकेमुळे शासन – प्रशासन हतबल : तर उपोषणकर्त्यालाही कागदी आश्वासन ! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 💠🌟💠

कर्जत चारफाटा ते श्रद्धा हॉटेल रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहे . राष्ट्रीय महामार्ग ७६ अन्वये कर्जत ते डोणे या रस्त्यांच्या अंतर्गत शासनाने हायब्रीड अँन्यूटी या योजने मार्फत हे काम चालू आहे . एकूण ५२ करोड रुपयांचे हे काम असून त्यानुसार भिसेगाव गेट श्रद्धा हॉटेल येथपर्यंत कामाची नोंद असताना पी . पी .खारपाटील ( उरण ) या मस्तवाल ठेकेदाराने चारफाटा ते डोणे हे काम पूर्ण केले आहे. मात्र उर्वरीत काम अर्धवट अवस्थेत ठेकेदाराने ठेवले असताना स्थानिक नागरिकांनी याविरोधात संताप व्यक्त केल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग – पनवेल तसेच कर्जत कार्यालयाने खारपाटील या ठेकेदारावर अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई केली नसून फक्त कागदी घोडे नाचवताना दिसत असून याविरोधात स्थानिक राजकीय शक्ती देखील ” ब्र ” शब्द काढत नसल्याने या रस्त्याचा वनवास कधी संपणार ? असा संतापजनक सवाल आता संपूर्ण कर्जतमध्ये घुमत आहे.

याविरोधात २ ऑक्टोबर रोजी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संघटनेचे कर्जत शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी उपोषणास बसणार असताना त्यांनाही कागदी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने व ठेकेदार खारपाटील यांना पुन्हा एकदा रस्त्याचे काम त्वरित चालू करावे , असे पत्र दिले आहे .

रेल्वे गेट- भिसेगाव ते चारफाटा हा रस्ता जरी कर्जत नगर परिषद हद्दीत येत असला तरी त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग ७६ अन्वये घेतले असताना हा एक किलोमीटर पर्यंत असलेला मार्ग पालिकेकडे वर्ग करण्याचा काहीही संबंध नसल्याचे व पालिकेने देखील आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्याचे लेखी सांगितले असताना रस्त्यासाठी ” खो ” घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचे उपोषणकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी सांगितले आहे .

या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था व यावरून मार्ग काढताना वाहन चालक व नागरिकांना तारेवरची होणारी कसरत बघता नागरिकांमध्ये मस्तवाल ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तसेच या ठेकेदारावर न होणारा राजकीय हस्तक्षेप या सर्व बाबीचा संताप पसरला आहे .
मा . कार्यकारी अभियंता – पनवेल यांनी मस्तवाल ठेकेदार खारपाटील यांना पत्र काढून सदरील काम करण्याचे आदेश दिले आहेत परंतु हे काम कुठल्या तारखेला चालू करणार याचा थांगपत्ता नसल्याने अद्याप तरी काम चालू कधी होणार याची काहीच शाश्वती नसून या रस्त्याचा वनवास कधी संपणार ? याची वाट सध्यातरी पहावी लागणार आहे .

मात्र अशा बेजबाबदार मस्तवाल ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याचे करोडो रुपयांचे बिल थकवावे शिवाय रस्ता बनविण्यास विलंब झाला म्हणून करोडो रुपयांचा दंड वसूल करावा , अशी मागणी जोर धरू लागली आहे .
भिसेगाव रस्त्यासाठी सदरील लढाई अधिक तीव्र करून ” रस्ता रोको ” हाच एकमेव पर्याय आता शिल्लक राहिला असल्याचे स्पष्ट दिसत आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.