Press "Enter" to skip to content

झोपडपट्टी भागातील नागरिकांना संरक्षण भिंतींची आवश्यकता

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔶🔷🔶

चाळीस वर्षांपासून मोलमजुरी तसेच लहानमोठे व्यवसाय करणारे असंख्य नागरिक आपल्या कुटुंबासोबत झोपडपट्टी भागात नैसर्गिक आपत्ती काळात सुध्दा प्रशासनाच्या कोणत्याही सुरक्षे शिवाय आणि सुनियोजित व्यवस्थे अभावी आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे निदान धोकादायक असणाऱ्या झोपडपट्टीच्या ठिकाणी प्रशासनाने संरक्षण भिंती उभाराव्यात अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

माथेरान मध्ये पर्यटन व्यवसाय जसजसा वृद्धिंगत होत गेला त्याप्रमाणे सन १९७० पासून नागरी वस्ती वाढत गेल्यामुळे हळूहळू १९७२ मध्ये इथे झोपडपट्टीचा उदय झाला.त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक आपल्या लवाजम्यासह झोपडपट्टी बांधून निवारा करीत आहेत.

नगरपरिषदे मार्फत सर्वच झोपडपट्टीला अनधिकृत शिक्कामोर्तब केले आहे अद्यापही ह्या झोपडपट्ट्या अधिकृत करण्यात आलेल्या नाहीत. राज्यातील विविध ठिकाणी झोपडपट्टी अधिकृत करण्यात आलेल्या असताना माथेरान मधील अनधिकृतचा शिक्का तसाच ठेवल्यामुळे भविष्यात या सर्वसामान्य लोकांवर कारवाईची एकप्रकारे टांगती तलवार आहे.या धारकांकडून विविध करांच्या माध्यमातून वार्षिक कर आकारणी नगरपरिषदे मार्फत केली जात आहे.

संत रोहिदास नगर त्याचप्रमाणे पंचवटी नगर या भागात सुध्दा खूपच धोकादायक ठिकाणी नागरीक झोपड्या बांधून रहात आहेत. आजूबाजूला मोठं मोठे पावसाळी पाणी तसेच ड्रेनेज सांडपाणी वाहून जाणारे नाले, गटारे आहेत त्याबाजूला झोपडपट्टीत लोक जागेच्या अभावी पावसाळ्यात तसेच अतिवृष्टीत सुध्दा कुटुंबातील सदस्यांसोबत आपला जीव मुठीत धरून दिवस मार्गक्रमण करीत आहेत.

यांच्या घराजवळ संरक्षण भिंती उभाराव्यात अशी मागणी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नागरिक करीत असल्याचे सांगण्यात येते. परंतु दरवेळी निवडणूक काळात पोकळ आश्वासनांची खैरात केली जाते एकदा का निवडणूक झाली की कुणीही आमच्याकडे फिरकत सुद्धा नाही असेही संतप्तपणे बोलले जात आहे.मागील दहा ते पंधरा वर्षांच्या काळात ज्या ज्या लोकांनी नगरपरिषदेमध्ये प्रथम नागरिक पद उपभोगले आहे.

त्यांच्या घराला संरक्षण भिंती उभारल्या गेल्या आहेत परंतु ज्यांना ही महत्वाची पदे भूषविण्यासाठी ज्यांनी आपले मतदान केले आहे त्या सर्वसामान्य मतदाराला हलाखीचे जीवन जगण्यास भाग पडत आहे.निदान झोपडपट्टी धारकांना सुध्दा जगण्याचा अधिकार आहे.तो त्यांना मिळाला पाहिजे अजून किती वेळा हे नागरिक नगरपरिषदेत निवेदने देत राहतील याला काही मर्यादा आहेत की नाही असेही नागरिकांमधून संतापाने बोलले जात आहे.


कोणी सुरक्षा भीत बांधून देईल का आमच्या घरांसाठी अनेक वर्षीपासून आम्ही मागणी करत आहोत.पण अजूनही आश्वासनचं मिळतं आहे.आज आमची चौथी पिढी माथेरान मध्ये आहे पण आमची आश्वासन फ़क्त कागदावरचं
जी माणसं सताधारी पक्षाचे असतील त्याचीच कामे होत आहेत.बाहेरून येणाऱ्या लोकांच्या घराला प्रथमतः प्राधान्य देत सुरक्षा भिंत बांधली जाते.परंतु स्थानिकांकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केले जाते.राजकारण्यांच्या सुखदुःखात स्थानिक लोक असतात बाहेरून येणारे लोक नाहीत हे लक्षात ठेवावे. दरवेळी आश्वासन फक्त कागदावरच राहतात. माथेरानच्या प्रशासनाला विनंती आहे आमची पण कागदपत्रे हलवावी आणि आम्हाला संरक्षण भिंती बांधून द्याव्यात.आम्हाला सुध्दा जगण्याचा अधिकार आहे की नाही ?


राकेश कोकळे — रहिवासी पंचवटी नगर तथा अध्यक्ष धनगर समाज माथेरान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.