वाटले एकदा ट्रेकिंग करावी
उंच उंच पर्वतांना साद द्यावी
सूर्य चंन्द्राचे उदय अस्त पहावे
निसर्गाचे नटलेले रूप पहावे
उंच उंच डोंगर खोल खोल दरी पहावी
कोसळणाऱ्या धबधब्यात अंघोळ करावी
पण मध्येच माझा हात सुटला तर?
पाय घसरून खोल दरीत पडलो तर?
म्हणून मी नवे काही केलेच नाही
घराच्या बाहेर कधी पडलोच नाही
एकदा वाटले डायविंग करावी
खोल समुद्रात बुडी मारावी
जलचरांची वेगवेगळी रूपे पहावी
दृष्टी आड लपलेली सृष्टी पहावी
डॉल्फिन सोबत सर्फिंग करावी
समुद्राच्या लाटांची मज्जा घ्यावी
अचानक शार्कचा हल्ला झाला तर?
किंवा मध्येच ऑक्सिजन संपला तर?
म्हणून मी नवे काही केलेच नाही
घराच्या बाहेर कधी पडलोच नाही
कधी वाटले पॅराग्लायडिंग करावे
उंच उंच हवेत पक्ष्यासारखे उडावे
मुंग्यांएवढी झालेली मोठी घरे पहावी
पक्षयांसोबत उडण्याची स्पर्धा करावी
पण मध्येच दोरी तुटली तर?
पॅराशूट अचानक फाटले तर?
म्हणून मी नवे काही केलेच नाही
घराच्या बाहेर कधी पडलोच नाही
अनागत विधाता बनून घरीच राहिलो
अनेक शंकांनी ग्रासून शांत च बसलो
न आलेल्या अडचणींचा पाढा वाचला
जुन्या संदर्भांचा खोदून आणला दाखला
नवीन आव्हानांचा सामना केलाच नाही
सरधोपट मार्गाला कधी सोडलेच नाही
डोळे मिटून दूध पिले, कोणाला कळले नाही
माझ्या कुपमंडुक वृत्तीला मी सोडलेच नाही
अज्ञात जगात फेरफटका मारलाच नाही
जर तर च्या कधी शृंखलना तोडलेच नाही
माझ्या हातून नवीन काही घडलेच नाही
कारण मी घराबाहेर कधी पडलोच नाही
शेखर अंबेकर, आदई







Be First to Comment