विविध ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔷🔶🔷
तालुक्यातील विविध क्षेत्रांचा विकास अपेक्षित असताना त्यासाठी प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर याकामी लक्ष घालायचे असताना अचानक कोविडच्या महामारीचे संकट आणि लॉकडाऊनचे बंधन सर्वांवर आले आहे. यामुळे जरी काही काळ आपण आपल्याच सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्नशील असलो तरी या पुढील काळात ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेऊन विकासाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी साथ दिली त्यांच्या अपेक्षांना खरे उतरण्याची जबाबदारी खासदार म्हणून वैयक्तिक जबाबदारी आहे, तशीच राज्यातील आघाडी सरकारमधील रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनीही घेतली आहे. यामुळे आपण पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झुकते माप देऊ, अशी ग्वाही खा.सुनील तटकरे यांनी येथे दिली.
पोलादपूर तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असता त्यांचे खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर रायगड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा प्रतिमा जाधव, तालुकाध्यक्षा प्रतिभा पवार, तालुकाअध्यक्ष वाय.सी.जाधव, शहरअध्यक्ष अजित खेडेकर, विधानसभा सरचिटणीस सुहास मोरे, ज्येष्ठ नेते कृष्णादादा करंजे, सुभाष जाधव, महाड तालुकाध्यक्ष निलेश महाडीक, अभंग सुरेश जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष महमद मुजावर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक संघटना, पोलादपूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सवाद हायस्कूलचे शिक्षकवृंद, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी खा.तटकरे यांचे स्वागत केले. यावेळी कापडे खुर्द, किनेश्वरवाडी, मोरगिरी, कालवली भोसलेवाडी तसेच अन्य ग्रामीण भागातील ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी जाहिर प्रवेश केला. याप्रसंगी अनेक संघटना व ग्रामस्थांनी विविध समस्यांबाबत खा. तटकरे यांना निवेदन दिले तर सवाद येथील कलाशिक्षकांनी खा.तटकरे यांचे तैलचित्र खा.तटकरे यांना भेट दिले.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना, महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये विकासाचे अनेक प्रश्न असताना नैसर्गिक आपत्ती, रोजगार, पर्यटन तसेच उद्योगनिर्मितीसारखे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. यासाठी प्रयत्न करताना तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून सन्मानाने वागणूक मिळेल, अशी सक्त सूचना करण्यात येईल,असे आश्वासन दिले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी गावातील भूस्खलनाकडे पत्रकारांनी जागरूकपणे लक्ष वेधून केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारचे याप्रश्नी लक्ष वेधले असून याकामी लवकरच पुन्हा सर्व वरिष्ठांसोबत पाहणी करण्यात येईल, अशी माहिती यावेळी दिली.
याप्रसंगी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये ग्रामस्थ, कार्यकर्ते व प्रवेशकर्ते यांनी सोशलडिस्टंन्सिंग आणि मास्क तसेच सॅनिटायझर लावून उपस्थिती दर्शविली होती. पोलादपूर तालुका अध्यक्ष वाय.सी.जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये तालुक्यातील विविध समस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असल्याचे नमूद केले. सुदास मोरे यांनी यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.








Be First to Comment