महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना सुद्धा विमा संरक्षण दिले पाहिजे : खा.सुनिल तटकरे यांनी दिली ना. अदितीताई तटकरे यांना सूचना
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶
कोविडच्या संकट काळात जशी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, अंगणवाडी व आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी आदींनी आपली जीवाची बाजी लाऊन काम केले त्याच प्रमाणे पत्रकारांनी सुद्धा आपला वसा ठेवत तत्परतेने काम केले. म्हणून महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना जसे विमा संरक्षण दिले तसे विमा संरक्षण पत्रकांना देखील दिले पाहिजे अशा सूचना रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांना दिल्या.
खा. तटकरे पुढे म्हणाले की, कोविडच्या महामारीच्या काळामध्ये आपल्या जिवाभावाच्या माणसांना आपल्याला मुकावे लागले हे संकट इतके भयावह होते की, त्यांचे शेवटचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. या महामारीच्या काळात सुद्धा आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानिमित्त सर्वांना पत्रकारितेचे महत्व कळत असते. एका बाजूला लॉकडाऊन असताना वर्तमान पत्र बंद झालेले असतानाच लोकांच्या मनामधील भावना वेगवेगळ्या घटनांचा आक्रोश या पत्रकारीतीच्या माध्यमातून भूमिका घेतली गेली. म्हणूनच पत्रकारांचे महत्व आपल्याला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाक्यातून पुन्हा जनजिवन उभे करण्याच्या बाबतीत पत्रकारांनी सुद्धा सरकारला व आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मौलिक सूचना दिली. म्हणून आंम्हाला चांगले काम करता आले. कुलाबा किल्ल्याच्या दुरवस्थे बाबत पत्रकारांनी सरकारचे लक्ष वेधले. पत्रकारांनी आपल्या वर्तमान पत्रातून वेगवेगळ्या व्यथा मांडल्या म्हणून योग्य पद्धतीने काम करण्याची मानसिकता आम्ही दाखवली.
यावेळी कोविड महामारीच्या कालावधीत माथेरानचे पत्रकार संतोष पवार, चिपळूणचे पत्रकार पेडणेकर, चणेरा-रोहा येथील पत्रकार बाबुभाई धणसे व नागोठण्याचे माजी सरपंच फरमानशेठ दफेदार यांचे दुख;द निधन झाले. या सर्व दिवंगतांना खा.तटकरे यांनी श्रध्दांजली वाहिली.
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा नववा वर्धापन दिन सोहळा नागोठण्यातील आराधना भवन येथे संपन्न झाला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा.सुनिल तटकरे बोलत होते. यावेळी रायगडच्या पालकमंत्री ना.अदितीताई तटकरे, आ.अनिकेतभाई तटकरे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, ठाण्याचे उद्योजक डॉ. जितेंद्र खेर, मनसे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी, कॉंग्रेस रोहा तालुका अध्यक्ष निजामभाई सय्यद, नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंंच लियाकत कडवेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, माजी उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते नारायण भोईर (गुरुजी), भाजपाचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य शैलेन्द्र देशपांडे, नागोठणे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर आदी मान्यवरांसह नागोठणे शहर व विभागातील पत्रकार असोसिएशनचे हितचिंतक व नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते नागोठणे येथील पत्रकार उदय भिसे यांना कै.तात्यासाहेब टके जेष्ठ पत्रकार पुरस्कार, रोह्याचे पत्रकार अल्ताफ चोरडेकर यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार व गुहागरचे(रत्नागिरी) पत्रकार उमेश शिंदे यांना युवा पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच शहर व विभागातील विविध शेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार खा.सुनिल तटकरे व पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

खा.सुनिल तटकरे म्हणाले की, पत्रकारांनी आपल्या विरोधात एखादी बातमी दिली तर रागावता कामा नये. त्या बातमीतील पत्रकारांची व जनतेची भावना काय आहेत हे समजून घेऊन आपल्या कामा मध्ये बदल केला तर आपल्या जीवनामध्ये चौफेरपणाचे अंग आपल्याला लाभते असा मौलिक सल्ला यावेळी खा.तटकरे यांनी ना.तटकरे व आ.तटकरे यांना दिला. खा.तटकरे पुढे म्हणाले की, नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असो. कै. तात्यासाहेब टके यांच्या नावाने पुरकर देत असते. कै.तात्यासाहेब टके यांचे योगदान जिल्ह्याला व रोहा तालुक्याला फार प्रमाणत होते. तात्यासाहेब सुद्धा समाजातील वेगवेगळे प्रश्नांना डोळसपणे विचार करून सोडवीत असत. एका समाजात जन्माला आलेल्या व्यक्तिमत्वाने सगळ्या परिसरात अत्यंत उत्तम पद्धतीने काम केले आहे म्हणून पत्रकार असो. कै..तात्यासाहेब टके यांच्या नावाने पुरस्कार देत असते याचा मला सार्थ अभिमान असल्याचे शेवटी खा.तटकरे यांनी सांगितले.
ना.अदितीताई तटकरे म्हणाल्या की, राजकारणात आपली कारकीर्द मोठी करायची असेल तर वृतपत्र वाचणे गरजेचे असल्याचा सल्ला खा.तटकरे साहेबांनी आम्हाला दिला आहे तसेच मी असे काम करेन की, पत्रकारांना माझ्यावर टीका करण्याची वेळच येणार नाही असा विश्वास यावेळी ना. तटकरे यांनी व्यक्त केला.
आ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. महेश पवार यांनी तर सुत्रसंचालन निंबाजी गीते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार व अध्यक्ष ॲड.महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.








Be First to Comment