माथेरान ला येणार्या पर्यटकांची मागणी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🌟💠🌟
कोरोनाच्या महाभयंकर काळात लॉक डाऊन नंतर सात महिन्यांनी २ सप्टेंबर रोजी माथेरान अनलॉक केल्यामुळे इथे आता मोठया प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु दस्तुरी नाक्यावर असलेल्या पार्किंग मध्ये गाड्या पार्क करण्यासाठी येथील वन संरक्षक समितीने पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष केंद्रित करावे जेणेकरून पर्यटकांना आपली वाहने बाहेर काढताना काहीच त्रास होणार नाही अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे.
सात महिन्यानंतर इथे पर्यटन व्यवसाय सुरू झाला आहे त्यामुळे नेहमी येणारे त्याचप्रमाणे नवख्या पर्यटकांनी सुध्दा माथेरान हे मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे पर्यटनस्थळ असल्याने सर्वाधिक पसंती दिली आहे. खासकरून मिनिट्रेनच्या सफरीसाठी इथे आवर्जुन पर्यटक भेट देत असतात. परंतु पावसाळ्यात चार महिने मिनिट्रेन बंद करण्यात येते आणि अद्याप कुठेही ट्रेन सेवा पुरेशा प्रमाणात सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश पर्यटक हे खाजगी वाहनाने अथवा स्वतःच्या मोटार गाडया घेऊन माथेरान मध्ये दाखल होताना दिसत आहेत.
दस्तुरी नाक्यावर बहुतांश जागा ही वनखात्याच्या अखत्यारीत येते त्यामुळे वनसंरक्षक समिती मार्फत केवळ जागेचे पार्किंग भाडे हे खाते आकारते.
कुठल्याही प्रकारची वाहनांची जबाबदारी हे खाते स्वीकारत नाही. नव्याने ह्या पार्किंगच्या सुशोभीकरणासाठी एमएमआरडीए च्या माध्यमातून कामे सुरू आहेत. अनेकदा या पार्किंग मध्ये पर्यटकांना स्वतःच्या मोटार गाडया पार्क करताना खूपच अडचणी निर्माण होत आहेत.
गर्दीच्या वेळी काही नवखे पर्यटक कुठेही आपल्या गाडया पार्क करत असतात त्यामुळे एखाद्याच्या गाडीला धक्का लागून नुकसान होण्याची शक्यता असते.मुबलक जागा असताना सुध्दा वेळप्रसंगी दाटीवाटीने गाडया पार्क केल्या जात आहेत त्यामुळे एखाद्याला आपली गाडी बाहेर काढण्यासाठी तासनतास वाट पहावी लागत आहे. पार्किंगच्या सुस्थितीत व्यवस्थेसाठी आणि पर्यटकांच्या सुखकर प्रवासासाठी वनसंरक्षक समितीने लक्ष केंद्रित करणे आवश्यक बनले आहे.
लॉक डाऊन नंतर आम्हाला समजले की,माथेरान मध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी मुभा दिली आहे त्यामुळे आम्ही सहकुटुंब स्वतःच्या वाहनाने इथे फिरावयास आलो होतो.परंतु निघतेवेळी आमची गाडी पार्किंग मधून बाहेर काढण्यासाठी खूपच विलंब लागला होता मध्ये कुणीतरी आपली गाडी टाकल्यामुळे आम्हाला ताटकळत कुटुंबातील सदस्यांसोबत राहावे लागले.तरी निदान संबंधित खात्याने आपल्या कामगार वर्गाला इथे येणाऱ्या गाड्या व्यवस्थित पार्किंग करण्यासाठी मदत केल्यास काहीही अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
श्रीकांत सूर्यवंशी - पर्यटक मुंबई
पार्किंगच्या वरील भागात आम्ही स्थानिकांच्या जवळपास २५ गाड्या पार्क होऊ शकतात अशी व्यवस्था केली आहे तर खालील बाजूस असणाऱ्या बोरीच्या मैदानात तीनशे पेक्षाही अधिक वाहने पार्क होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी कुणाचीही तारांबळ उडू नये यासाठी पार्किंग जागेत लाईन आखून त्याजागी व्यवस्थित गाडया पार्क होऊ शकतात.आमचे कामगार सुध्दा बारकाईने या ठिकाणी पार्किंगच्या सुस्थितीत व्यवस्थेसाठी तत्पर राहणार आहेत.
योगेश जाधव --अध्यक्ष माथेरान वन संरक्षक समिती








Be First to Comment