बाई तुझ्या पायाखाली
उन्हाळली वाट
भाजू गेले तळपाय
तरी मान ताठ
टिचलेल्या बांगडीचा
कोना खरचटे
तरी मोळी उचलते
तुझे मनगट…
बाई तुझ्या पाठीवर
झोडलेले डाग
चुरचुरे चोळीकाठी
नाजूकसा भाग
फाटक्याश्या पदरात
लपवून लाज
दोन्ही खांदे झाक आणि
घरंदाज वाग…
बाई तुझ्या डोळ्यामध्ये
का गं रोज पाणी
बाभळीचा जन्म, तुझी
बोचरी कहाणी
अधांतरी झुला तुझा,
तारेवर जीव
तरी कशी गाते बाई
आनंदाची गाणी ??
बाई तुझ्या हातावर
रंगलेली मेंदी
ठिपक्यात जोडलेल्या
सोसण्याच्या नोंदी
दोन दिवस कौतुक
मग खेळ जुना
एक बोटं भाजलेलं
एका बोटी चिंधी…
बाई तुझं मोठं मन
तुझ्याहून थोर
हाल सोसून सोसून
झालं मऊशार
कुणाकुणासाठी जीव
जाळशील रोज
तुझ्या उभ्या आयुष्याला
माझा नमस्कार…
पूजा जगदिश भडांगे, पुणे







Be First to Comment