Press "Enter" to skip to content

थेट सरपंचांच्या संगीतखुर्चीच्या खेळाला नव्या जीआरचा पायबंद

पोलादपूर चार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची निवडणूक रखडली 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔶

तालुक्यातील संघटनात्मक निर्णय किंवा पक्षादेश अथवा गावकीचा निर्णय या संकल्पनांखाली सुरू असलेल्या थेट सरपंच पदाच्या संगीतखुर्चीच्या खेळाला महाराष्ट्र शासनाच्या नव्या परिपत्रकाचा पायबंद बसला असून गेल्या आठ महिन्यांपासून राजिनामे दिलेले चार ग्रामपंचायतीचे सरपंच पदासह सदस्यपदावरूनही बेदखल झाले असून संघटनांनी घटनात्मक पेच निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संघटना, पक्षादेश आणि गावकीचे निर्णय हे गेल्या अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुक्यात प्रभावी ठरत असून विशिष्ट पदासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरलेला असताना या संकल्पनांमुळे पदांवरील व्यक्तींना त्यांचा कालावधी पूर्ण करण्यापूर्वीच राजिनामे द्यावे लागत आहेत. थेट सरपंच पदासाठी पाच वर्षांचा पूर्ण कालावधी असताना अडीच वर्षे अथवा दोन वर्षे कालावधीचे दोन आणि शेवटच्या एका वर्षासाठी एक असे तीन सरपंच विराजमान केले जात आहेत. यासोबत पंचायत समितीच्या सभापतीपदाचा देखील अडीच वर्षांचा कालावधी असताना मागील पाच वर्षांत असाच संगीतखुर्चीचा खेळ मांडला गेला. पोलादपूर नगरपंचायतीमध्येदेखील अडीच वर्षे महिला सर्वसाधारण पदासाठी आरक्षण असताना दोन महिला नगराध्यक्ष झाल्या तर दुसऱ्या अडीच वर्षांचा कालावधी नामाप्र पुरूष असताना तिसरे नगराध्यक्ष विराजमान झालेले दिसून येत आहेत.

यामुळे पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वत्र संगीतखुर्चीचा खेळ सुरू झालेला दिसून येत असताना यंदा ग्रामपंचायत काटेतळी येथील थेट बिनविरोध महिला सरपंचांसह आठ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती अजय मोरे यांनी 27 जानेवारी 2020 रोजी राजिनामा दिल्यानंतर तसा अहवाल 24 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. बहुचर्चित सरपंचांसह 10 सदस्यीय लोहारे ग्रामपंचायतीचे सरपंच किसन दगडू पारकर यांनी दि. 2 मार्च 2020 रोजी दिलेल्या राजिनाम्याबाबत 8 मे 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल देण्यात आला. उमरठ येथील सरपंचांसह 8 सदस्यीय ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ गोपाळ कळंबे यांनी 24 जून 2020 रोजी राजिनामा दिल्यानंतर 13 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल देण्यात आला तर सरपंचांसह आठ सदस्यीय ओंबळी ग्रामपंचायतीमध्ये शशिकांत सहदेव चिकणे यांनी 14 जुलै 2020 रोजी राजिनामा दिल्याचा अहवाल 11 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. या चारही ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या फेरनिवडणूका अद्याप जाहिर होऊ शकल्या नाहीत.

राज्य सरकारने थेट सरपंच पदाच्या निवडणुकांची पध्दत रद्द करून पुर्वीप्रमाणे सदस्यांमधून सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रभागांतून मतांचे सातत्य ठेऊन ग्रामपंचायतीतील सर्वाधिक मतदान झालेल्या सरपंचाला राजिनामा दिल्यानंतर त्याच ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून मान्यता मिळणार नाही. याखेरिज, ज्या सरपंचपदाचे आरक्षण ज्या प्रवर्गाचे असतील त्याच प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकतो. उर्वरित सदस्यांतून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करायचा झाला तर निवडणूकपूर्व आरक्षणानुसार सर्व पक्षांना व गटांना सदर आरक्षणानुसार उमेदवार रिंगणात लढवायची संधी न मिळाल्याने ज्या सदस्याकडे आरक्षणानुसार प्रवर्ग असेल त्यालाच संधी मिळू शकेल अशी अटकळ आहे. मात्र, याबाबत आघाडी राज्यसरकारने आधीचा निर्णय रद्द केल्याचे परिपत्रक जारी केल्यानंतर याबाबतची स्पष्टता होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. नव्या परिपत्रकानुसार केवळ काटेतळी आणि लोहारे ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवडणूक थेट जाहिर होऊ शकते तर उमरठ आणि ओंबळीतील थेट सरपंचपदासाठी सदस्यांमधून निवड होऊ शकते. मात्र, पाच वर्षांसाठी निवडून आलेला सरपंच पदावरील लोकप्रतिनिधी सदस्यपदालाही मुकणार असल्याने लोकशाहीच धोक्यात आली आहे. यापुर्वी सरपंचपदाचा राजिनामा दिलेल्या व्यक्तीला सदस्य म्हणून ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत राहता येत असे, हा प्रकार यामुळे घडणार नाही तसेच सरपंच पद थेट असल्याने प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याला सरपंचपदावर विराजमान होता येणार नाही, हे या गोंधळाचे स्वरूप असणार आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ग्रामपंचायत उपमुख्याधिकारी रायगड जिल्हा परिषद आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर याप्रश्नी आता राज्यसरकारचाच अभिप्राय मागविण्याचा निर्णय झाल्यामुळे नजिकच्या काळात याबाबत कोणतीही हालचाल न होता चारही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक टळणार आहे. परिणामी, पोलादपूर तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतीतील ज्या सदस्यांनी अथवा थेट रपंचपदाच्या संभाव्य उमेदवारांनी राजकीय व्यूहरचना करून सरपंच पद काबिज करण्याची दिवास्वप्नं बघितली त्यांना आणखी काही काळ कळ सोसावी लागणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.