सिटी बेल लाइव्ह । उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷
जासई येथे उरण - बेलापूर रेल्वे अतिक्रमण निमित्ताने सिडकोचे अतिक्रमण पथक आज आले होते. या पथकाला प्रकल्पग्रस्तांच्या रौद्ररूपाचा सामना करावा लागला. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे नेते सुरेश पाटील यांनी आमच्या मागण्या पूर्ण करा तोपर्यत हात लावून देणार नाही असा इशारा देताच अतिक्रमण पथक हातहालवत माघारी परतले आहे.
या अतिक्रमण पथकामध्ये मुख्य नियंत्रक मा.अनिल पवार,वरिष्ठ नियंत्रक सुहास राणे,सहाय्यक नियंत्रक आर. के. वेटा आणि त्यांचा इतर स्टाफ लवाजम्यासह आला होता, या वेळी न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी त्यांना रोखत त्यांना जाब विचारला की,आमचा साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे.

२०१४ च्या एमटीएचएल कराराची अंमलबजावणी अजून झालेली नाही. गावठाण विस्ताराचा प्रश्न अजून सोडविला नाही.गाव नागरी सुविधांचा प्रश्न तसाच आहे आणि आताचा साडेबावीस टक्के भूखंडाचा प्रश्न अनुत्तरित आहे. घोषणा केलेले साडेबावीस टक्के भूखंड आम्हां प्रकल्पग्रस्तांना कुठे आणि केव्हा देणार ? हे पहिल्यांदा सांगा. आज पर्यंत आम्हां प्रकल्पग्रस्तांना सिडको, जेएनपीटी, रेल्वे, एनएचअेआय, यांच्या कडून अनेक पोकळ आश्वासने दिली परंतु त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही.
पहिल्यांदा आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवा,दिलेली आश्वासने पूर्ण करा मगच तुम्हाला येथे पाय ठेऊन देऊ असे परखड सवाल सुरेश पाटील यांनी या पथकातील वरिष्ठांना विचारले. प्रकल्पग्रस्तांचे रौद्ररुप पाहून निरुत्तर झालेले सिडकोचे अतिक्रमण पथक हात हलवत परत गेले आणि त्यांनी आश्वासन दिले की या तुमच्या प्रकल्पग्रस्तांच्या भावना आम्ही सिडको एमडीना कळवितो.
या अतिक्रमण पथकाला रोखण्याच्या कामी सुरेश पाटील यांच्या सोबत जासई भाजप विभाग अध्यक्ष श्री मेघनाथ म्हात्रे, जितेंद्र पाटील आणि इतर ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.








Be First to Comment