- कामबंद आंदोलन करणार 🔶🔷
- सोमवार पासून दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्याचा संजय जांभळे यांच्यासह ठेकेदारांचा एकमुखी ठराव 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पेण ।( राजेश कांबळे ) 🔶🔷🔶
तालुक्यातील डोलवी येथील जे. एस. डब्ल्यू. कंपनीच्या प्रशासनाने स्थानिक ठेकेदारांवर करत असलेल्या अन्यायाविरोधात धायरेश्वर ठेकेदार संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून या अन्याया विरोधात कामबंद आंदोलन बरोबरच सोमवारी (ता.5 ) कंपनीचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करणार असल्याची माहिती धायरेश्वर ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष संजय जांभळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या आंदोलनाला पेण चे आमदार रविशेठ पाटील व अलिबाग चे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील आपला सक्रीय पाठींबा दर्शविला आहे.
जे. एस. डब्ल्यू. स्टील कंपनीतील धायरेश्वर ठेकेदार संघटने च्या सभासदांची सभा आज ( ता. 2) वडखळ येथे संपन्न झाली.यावेळी पेण चे आमदार रविशेठ पाटील व अलिबाग चे आमदार महेंद्र दळवी यांच्या सह संघटनेचे अध्यक्ष संजय जांभळे, उपाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे,एम. डी. पाटील,वडखळ चे सरपंच राजेश मोकल, डोलवी सरपंच वनिता अनिल म्हात्रे, कारावी सरपंच तुळशीदास म्हात्रे आदींसह शेकडो ठेकेदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय जांभळे यांनी म्हटले कि, कंपनी चे अधिकारी आंधळे व बहिरे झाले आहेत मागील अनेक वर्षांपासून ठेकेदाराच्या मागण्यांकडे नेहमी दुर्लक्ष करत आहेत. तीन महिन्यांपूर्वी देखील या अन्याया विरोधात आवाज उठवला होता. मात्र कंपनीचे अधिकारी एका बाजूला आश्वासन देतात तर दुसऱ्या बाजूला ठेकेदारांवर दबाव निर्माण करत असल्याचे जांभळे यांनी सांगितले. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आपल्या नातेवाईकांना येथे आणून कामे दिली जात आहेत हा कंपनीचा मुजोरपणा आहे. कंपनीच्या विरोधात प्रदूषण व कांदळवन ची अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत मात्र कंपनी त्याला देखील जुमानत नाही असे म्हटले.
या कंपनी मुळे पेण तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. कंपनी कामगारांची देखील काळजी घेत नाहीत. अनेक राज्यातून कंपनीत कामगार आले आहेत त्यांची कोणतीही कोविड टेस्ट केली जात नाही,त्यांना विलगीकरन ठेवले जात नाही असा आरोप देखील संजय जांभळे यांनी यावेळी केला.
स्थानिक ठेकेदारांना कामाचा वेगळा कमी रेट व बाहेरील ठेकेदारांना जास्त रेट ने काम दिले जात आहे.पंधरा वर्षापूर्वी दिले जाणारे दर आज देखील दिले जात आहेत ; या अन्याया विरोधात धायरेश्वर ठेकेदार संघटनेमार्फत सोमवार पासून दोन्ही प्रवेशद्वारावर शांतपणे आंदोलन करून दोन्ही गेट बंद करणार असल्याची माहिती संजय जांभळे यांनी दिली.
कंपनी ने वडखळ, कराव आदी ग्रामपंचायत मध्ये बेकायदेशीर पणे कामगारांच्या वसाहती उभारल्या गेल्या आहेत. यामुळे या दोन्ही ग्रामपंचायत मध्ये रोगराईचे प्रमाण वाढले आहे. या बाबत दोन्ही ग्रामपंचायत तर्फे रायगड जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रारी केल्या आहेत.मात्र त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.कासू व वडखळ प्रभागातील कोरोना रुग्णांचा खर्च जे.एस. डब्ल्यू. कंपनीने करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
मी ठेकेदार संघटनेच्या पाठीशी - आमदार रविशेठ पाटील
जे. एस. डब्ल्यू. स्टील कंपनीने मागील 25 वर्षांत हा परिसर भकास केला असल्याचा आरोप आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी केला.स्थानिकांनी कंपनीच्या उभारणीसाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत आणि आज जर कंपनी त्यांच्यावरच अन्याय करत असेल तर ते कदापी सहन करणार नसल्याचा इशारा दिला असून स्थानिक ठेकेदार संघटनेच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असून भविष्यात मोठे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
अलिबाग चे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील स्थानिक ठेकेदारांच्या आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर केला.








Be First to Comment