Press "Enter" to skip to content

पाली ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा संपली..!


महाराष्ट्र शासनाकडे सव्वादोन एकर जमिनीचे झाले हस्तांतरण 🔶🔷🔷🔶

निमंत्रण न दिल्याने राष्ट्रवादीची नाराजी 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशील सावंत) 🔷🔷🔶🔶

सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत अत्यंत महत्वपूर्ण व आवश्यक असलेल्या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी येऊनही काम रखडले होते. हे रुग्णालय वर्ष 2011 पासून लालफितीत आणि राजकीय श्रेयवादामध्ये अडकले होते. पाली ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. बुधवारी ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सव्वा दोन एकर (98 गुंठे) जमिनीचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आले.

पालीत ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी सत्यशोधक वारकरी महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष हभप महेश पोंगडे महाराज व इतरांनी स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पालीत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पर्यायी जागा शोधून ग्रामीण रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते .

ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक जागेची मोजणी प्रक्रिया, सातबारा नोंदणी, जिल्हा शल्य चिकित्सकांना जागेचा ताबा देण्याची कार्यवाही आणि नव्या बाजारभावाने बांधकाम अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी.तसेच ग्रामीण रुग्णालय सुरू होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू राहणे आवश्यक असल्याने ते तात्पुरते अन्य जागेत स्थलांतरित करण्यासाठी नव्या जागेची चाचपणीही त्वरित करून घ्यावीअसे निर्देश दिल्यानंतर ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक त्या हालचालींना तालुका प्रशासनाने वेग दिला. ग्रामीण रुग्णालयाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. 14) अदिती तटकरे, शासकीय पदाधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात ऑनलाइन बैठक संपन्न झाली होती. त्यानुसार आज पाली प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या जवळील जागेचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळीआरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी जागेची पाहणी करून ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठीच्या आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी सांगितले की ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू झाल्यावर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी येथिल शासकीय विश्रामगृहामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येऊ शकेल. असे सुरेश खैरे म्हणाले.

यावेळी आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे व रवींद्र देशमुख, पंचायत समिती सभापती रमेश सुतार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, शाखा अभियंता दिलीप मदने, राजेश मपारा, राजेंद्र राऊत, आरिफ मणियार, आंदोलनकर्ते महेश पोंगडे महाराज आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

निमंत्रण न दिल्याने राष्ट्रवादी ची नाराजी

ग्रामीण रुग्णालय हस्तांतरण कार्यक्रमात राष्ट्रवादीला डावळले असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष गीता ताई पालरेचा, ग.रा.म्हात्रे, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, संदेश शेवाळे, सागर मिसाळ व संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळी जाऊन याबाबत पाली तहसीलदारांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.

पाली ग्रामीण रुग्णालय जमिनीची पाहणी करतांना आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉ. गौरी राठोड व इतर मान्यवर.
पाली ग्रामीण रुग्णालय होण्यामधील बऱ्याच अडचणी दूर झाल्या आहेत. यासाठी सव्वा दोन एकर जागा उपलब्ध झाली आहे. लवकर टेंडर मंजूर करून ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी पाठपुरावा करेन. पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय लवकर कार्यान्वित होईल.

डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक
जनहिताच्या प्रश्नावर हाती घेतलेले आंदोलन यशस्वीतेच्या वाटेवर आहे. पहिले सकारात्मक पाऊल पडलेले आहे. पाली ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी राहून तेथून पहिला रुग्ण बरा होऊन बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असेल आणि तेव्हा खरा आनंदी असेल.

ह.भ.प महेश पोंगडे महाराज, आंदोलनकर्ते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.