आंदोलकांचा आठ तास ठिय्या : गुन्हे मागे घेण्याची मागणी : ३ ऑक्टोबरला बैठकीचे आयोजन 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे (महेश पवार) : 🔷🔷🔶🔶
(पूर्वीचा आयपीसीएल) उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यासाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने सुरु आहेत. अशातच कोरोनाच्या काळात ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या शांतता मोर्चात सहभागी झालेल्या ३४ जणांवर नागोठणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत ते खोटे असल्याने हे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी (दि.३०) नागोठणे पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून सुमारे आठ तास ठिय्या मारून हात जोडो आंदोलन केले. यामध्ये ९० वर्षांच्या एक वृद्ध आजीबाईंसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी,जी, कोळसेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राज्य संघटक राजेंद्र गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी गंगाराम मिणमिणे व इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाची सुरुवात नागोठणे एस.टी. स्थानकापासून बुधवारी सकाळी ११ वाजता करण्यात आली. त्यानंतर सर्व आंदोलकांनी नागोठणे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून गुन्हे मागे घेण्यासाठी हात जोडो आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे रखरखत्या उन्हातही हे आंदोलक संध्याकाळ पर्यंत मागे हटले नाहीत.

आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या रिलायन्स प्रकल्पग्रस्तांवरील खोटे गुन्हे जोपर्यंत मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत असा पवित्रा यावेळी आंदोलकांनी घेतला. त्यामुळे अखेर या आंदोलनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खास उपस्थित असलेले रोह्याचे उपअधिक्षक किरणकुमार सूर्यवंशी, नागोठण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, पालीचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब कुंभार व लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यात नागोठणे पोलीस ठाण्यात सायंकाळी ७.१५ वा. प्रदीर्घ चर्चा झाली. त्यामध्ये ३ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व रिलायन्स व्यवस्थापन यांच्यासोबत बैठक घेवून चर्चा करण्यात येईल असे ठरविण्यात आले. त्यानंतर रिलायन्स प्रकल्पग्रस्तांनी हे हात जोडो आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले.
नागोठणे पोलीस ठाण्यासमोरील या हात जोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागोठणे पोलीस ठाण्यातील पोलिसांसह रोहा, कोलाड व पाली येथून पोलासांची अधिक कुमक मागविण्यात आली होती तसेच राखीव पोलीस दललाही यावेळी पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे नागोठण्याला छावणीचे स्वरूप आले होते. त्यामुळे या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी तोंडाला मास्क लावून तसेच इतर नियमांचे पालन केले होते.








Be First to Comment