उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मागासवर्गीय तरुणीवर अमानवीय अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशील सावंत) 🔶🔶🔷🔷
उत्तर परदेशातील हाथरस येथे दिल्लीतील निर्भया सारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. 19 वर्षीय मागासवर्गीय तरुणीवर माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून अमानवीय अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सुधागड वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात निवेदन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना देण्यात आले. तसेच यूपी सरकार व पोलीसांचा निषेध करून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण राज्य व देशभरात संताप व्यक्त होत असताना सुधागडसह जिल्ह्यात देखील याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित असल्याचे सातत्याने समोर आले आहे, येथील गुंडाराज कधी थांबणार असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थीत केला आहे.
येथील गँगरेप बाबत सरकार निष्क्रिय दिसून आले. समाज मनांचा उद्रेक झाल्यानंतर पोलिसांनी आठ दिवसानंतर तक्रार दाखल केली. याचाही निषेध यावेळी दर्शविण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हा प्रकार जातीवादी विकृतीतून घडला आहे. दलित समाजावर होणारे अत्याचार दिवसागणिक वाढत चालले आहे हे थांबविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी. तसेच त्या नराधमांना फाशी देऊन आमच्या बहिणीला न्याय द्या अशी मागणी निवेदनात वंचित बहुजन आघाडी सुधागडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष अमित गायकवाड, सरचिटणीस आनंद जाधव, सल्लागार वि. भा. कदम, संपर्क प्रमुख अमोल साळुंखे, राहुल गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील जाधव, उपाध्यक्ष रोहित भालेराव, सचिव प्रशांत जाधव व वैभव जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment