Press "Enter" to skip to content

पॉइंट 2 पॉइंट

राजस्थान ची विजयाची हॅटट्रिक चुकली

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील बारावा सामना बुधवारी (३० सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना कोलकाताने ३७ धावांनी जिंकत या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे कोलकाताने या हंगामात सलग २ सामने जिंकणाऱ्या राजस्थान संघाला पराभूत केले. कोलकाताच्या या विजयाचा हिरो शिवम मावी ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाणेफेक जिंकत राजस्थान संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कोलकाताला फलंदाजासाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या.

कोलकाताने दिलेल्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १३७ धावाच करता आल्या.

राजस्थान संघाकडून फलंदाजी करताना टॉम करनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३६ चेंडूंत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सोबतच सलामीवीर फलंदाज जॉस बटलरने २१ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाज राहुल तेवतियाव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.

कोलकाताकडून गोलंदाजी करताना शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सोबतच सुनील नरेन, पॅट कमिन्स आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाकडून सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत ४७ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर ऑयन मॉर्गनने ३४ धावा केल्या. सोबतच आंद्रे रसेल (२४) आणि नितीश राणा (२२) हे फलंदाज सोडले, तर इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही.

राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. सोबतच अंकित राजपूत, जयदेव उनाडकट, टॉम करन आणि राहुल तेवतिया या गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.