सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔶🔷🔷🔶
कोरोनाच्या महामारीत सर्वच ठप्प असल्याने अनेकांना आपली नोकरी गमावून उपासमारीचे संकट आले आहे. परंतु उरणमधील प्रसाद विनायक जोशी यांनी न डगमगता हातात चहाची किटली घेऊन व्यवसायाला सुरुवात केली.
त्यामुळे नोकरीच्या पगारापेक्षा जास्त पगार मेहनत करून प्रसाद जोशी मिळवीत आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे लागून तुटपुंज्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून जास्त पैसे मिळविता येते असल्याचे प्रसाद जोशी यांनी दाखवून दिले आहे. याचे अनुकरण करून तरुणांनी व्यवसायात उडी घेण्यास हरकत नाही.
उरणमधील प्रसाद विनायक जोशी या तरुणाची कंपनी बंद पडल्याने नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी इतर अनेक ठिकाणी काम केले. करंजा येथील द्रोणागिरी शाळेत तुटपुंज्या 8 हजार पगारावर कामाला होता. परंतु कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने त्याठिकाणीही नोकरीवर गदा आली. त्यामुळे पत्नी व मुलांचा सांभाळ करणे कठीण बनले होते. पत्नी ही कामाला होती पण तिचा ही पगार घरखर्च भागविण्यातच संपून जात होता.
लॉकडाऊनमुळे प्रसाद नैराश्याच्या गर्तेत असताना त्यांनी मित्राकडे आपली खंत बोलून दाखविली त्यावेळी त्याठिकाणी असलेल्यांनी लाज लज्जा सोडून व्यवसाय करावा लागेल तो ही कमी खर्चाचा असेल असे सांगत चहा करून शहरभर फिरून व्यवसाय केलास तर कमी खर्चात जास्त फायदा मिळेल असे सांगितले. त्याक्षणीच प्रसाद यांनी ठाम विचार करून दुसर्या दिवसांपासून स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला.
प्रसादने चहाचा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर महिना 4 ते 5 हजार रुपये मिळत असत. त्यानंतर व्यवसाय वाढत आता महिना 15 ते 17 हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे. आता चहाचे व्यवसाय करणारे अनेकजण परत आल्याने थोडाफार फरक व्यवसायावर पडला असल्याचे सांगत नोकरी पेक्षा या कमी खर्चाच्या चहा व्यवसायात जास्त पैसे मिळतात व कोणा वरिष्ठांचे चार शब्द ऐकावे लागत नसल्याने या व्यवसायात मी व माझे कुटुंब सुखसमाधानी असल्याचे प्रसाद जोशी यांनी सांगितले.
नोकरीच्या मागे लागून तुटपुंज्या पगारात वरिष्ठांची बोलणी खात काम करण्यापेक्षा तरुणांनी स्वतः व्यवसाय करून आपल्या पायावर उभे रहाण्यास हरकत नसल्याचे प्रसाद जोशी यांनी सुरू केलेल्या व्यवसायावरून दिसून येते.








Be First to Comment