Press "Enter" to skip to content

न्हावा शेवा बंदर कामगार संघटनेची खासगीकरणा विरोधात निदर्शने

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶

नेहमीच फायद्यात असलेले जेएनपीटी खासगीकरण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने चालविला आहे. त्याविरोधात न्हावा शेवा (अंतर्गत) बंदर कामगार संघटनेने आज जेएनपीटी प्रशासन भवन इमारती समोर निदर्शने करून जेएनपीटीचे खासगीकरण होऊ देणार नाही. वेळप्रसंगी आंदोलन उभारू असा इशारा यावेळी दिला.

केंद्र सरकारने अनेक कंपन्या खासगीकरण करण्याचा डाव आखला आहे. त्यामध्ये जेएनपीटी बंदराचाही समावेश आहे. त्याविरोधात जेएनपीटी कामगार संघटनांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या समोर कामगार प्रतिनिधींनी आपल्या व्यथा मांडत आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. यावेळी शरद पवार यांनी जेएनपीटीचे खासगीकरण होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले.

केंद्र सत्कारचा खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज न्हावा शेवा(अंतर्गत) बंदर कामगार संघटनेनी जेएनपीटी प्रशासन भवनासमोर निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने दिली होती. त्याचा त्यांना आता विसर पडला आहे. त्यांनी एकामागोमाग अनेक शासकीय कंपन्या खासगीकरण करण्याचा डाव रचत एक प्रकारे देशच विकायला काढल्यासारखे वाटत आहे. इतर सर्व बंदरे हे खासगी आहेत.

जेएनपीटी हे देशातील एकमेव बंदर शासकीय आहे. आता तोही खासगीकरणाच्या मार्गावर आहे. जर हे ही बंदर खासगीकरण झाले तर उद्या एखाद्या देशाने हल्ला केला तर आपण कोणत्याच बंदराचा उपयोग करू शकत नाही. तसेच जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत दिलेली साडेबारा टक्केची इरादे पत्रे ही खोटी आहेत. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांची आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावायचे सोडून खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सुरुवाती पासून जेएनपीटी बंदर फायद्यात असतानाही खासगीकरणाची गरज काय असा सवाल कामगार संघटनेनी उपस्थित केला. प्रशासनाने अद्ययावत यंत्रसामग्री दिली तर याहीपेक्षा उत्पन्न काम करून वाढविण्याची क्षमता कामगार वर्गाची असल्याचे कामगार प्रतिनिधींनी सांगितले.

यावेळी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी खासगीकरणाला विरोध करीत आपण कामगारांच्या प्रत्येक लढयात पुढे असू असे सांगत पंतप्रधान मोदी हा फेकुचंद असल्याचे सांगत त्यांनी येथील प्रकल्पग्रस्तांना खोटी इरादे पत्र देऊन सिद्ध केले आहे. आज फायद्यात असलेले जेएनपीटी बंदर खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे.

त्यांचा हा डाव उलटून लावल्याशिवाय जेएनपीटी कामगार व प्रकल्पग्रस्त स्वस्थ बसणार नाही असा त्यासाठी १९८४ सारखे आंदोलन उभारावे लागले तरी उभारू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

या प्रसंगी ट्रस्टी भूषण पाटील, संघटनेचे अध्यक्ष दिनेश घरत, मधुकर कोळी, गणेश घरत, संदीप पाटील यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कामगारांनी खासगीकरणाविरोधात वेळपडली तर सर्व कामगार आपल्या कुटुंबासह आंदोलन करतील असा इशारा त्यांनी देत. पंतप्रधान मोदी विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.