Press "Enter" to skip to content

एलऍण्डटी कंपनीकडून धामणदिवीतील 9 दरडग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) 🔶🔷🔷🔶

तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील धामणदिवी गावालगत महामार्गावर 9 आणि 10 जुलै 2020 रोजी दरड कोसळल्यानंतर दरडीचा मलबा एलऍण्डटी ठेकेदार कंपनीकडून लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींमध्ये टाकण्यात आला. यासंदर्भात बुधवारी धामणदिवी येथे एलऍण्डटी ठेकेदार कंपनीकडून 9 दरडग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे सानुग्रह वाटप करण्यात आले.

लवकरच शेतजमिनीचीही साफ सफाई विनामूल्य करून देण्यात येणार असून सरकारी मदतीसाठी भूवैज्ञानिक स्तरावर सर्व्हेक्षणाची गरज असल्याचे यावेळी निवासी नायब तहसिलदार समीर देसाई यांनी सांगितले.

पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी येथे यंदा पावसाळयामध्ये मुंबई गोवा राष्ट्र्रीय महामार्गावर दरड कोसळून तब्बल 20 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरडीचा मलबा हटविताना धामणदिवीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये टाकण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईला कोणी वाली आहे काय, असा सवाल रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केला. यानंतर रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी या दरडग्रस्त गावाला भेट देऊन पाहणी केली असता स्थानिक महिला कार्यकर्त्या क्षमता राजेश बांद्रे यांनी खा.तटकरे यांना शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तसेच धामणदिवी ग्रामस्थांना भविष्यात दरडीचा धोका असल्याचे निवेदन दिले.

खा.तटकरे यांनी तातडीने दखल घेत तत्कालीन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या उपस्थित प्रशासनाला शेतकऱ्यांना भरपाई आणि दरडीच्या संभाव्य धोक्यापासून ग्रामस्थांना आणि त्यांच्या घरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रशासनाने दरडीच्या धोक्यापासून स्थलांतर करण्याची गरज असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी रायगड आणि खा.तटकरे यांना सादर केला.

यानुसार खा.तटकरे यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे धामणदिवी गावातील दरडीच्या धोक्याखालील घरांचे चौपदरीकरणात भूसंपादन तसेच घरांचे स्थलांतर करण्याचे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

यानुसार बुधवारी दुपारी साडेबारा वाजता धामणदिवी येथे एलऍण्डटी ठेकेदार कंपनीकडून दरडीचा मलबा टाकल्याने नापीक जमीन झालेल्या नऊ शेतकऱ्यांना प्रतिगुंठा पाचशे रूपयांप्रमाणे 55 हजार 900 रूपयांचे सानुग्रह नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले. यावेळी धामणदिवीचे सरपंच शांताराम पारदुले आणि मंडल अधिकारी मुंडेकर तसेच एलऍण्डटी ठेकेदार कंपनीचे देसाई हे उपस्थित होते. यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील मलबा हटविण्याचे काम एलऍण्डटी ठेकेदार कंपनीकडून विनामूल्य करून देण्यात येईल, अशी माहिती एलऍण्डटी ठेकेदार कंपनीच्यावतीने प्राप्त झाल्याचे मंडल अधिकारी मुंडेकर यांनी सांगितले.

धामणदिवीतील तसेच कशेडी घाटातील सर्व धोकादायक नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात तहसिल कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासनाला आवश्यक ते अहवाल सादर केले असून या परिसराची भूवैज्ञानिक स्तरावर पाहणी होऊन अहवाल तयार झाल्यास शासनस्तरावरील मदत आणि स्थलांतर तसेच पुनर्वसनाच्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती निवासी नायब तहसिलदार समीर देसाई यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.