Press "Enter" to skip to content

रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक चर्चा

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे 🔶🔷🔷🔶

रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोलाशे एकर जमीन सातशे रुपये एकरी कवडीमोल भावाने १९६० मध्ये एचओसी कंपनीला दिली.हीच जमीन एचओसीने करोडो रुपये एकरी ने देण्यास सुरुवात केली आहे.यातच बिपिसिएल व्यवस्थापन पोलिस बंदोबस्तात कुंपणाचे काम सुरु करणार असल्याचे समजताच शेतकऱ्यांनी विरोधाचा सूर धरला. एकत्र जमून निदर्शने केली, बंदोबस्ताच्या दिवशी मोर्चाचे आयोजनदेखील केले.

शेतकऱ्यांसोबत माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेकानंद पाटील, आमदार बाळाराम पाटील, बबनदादा पाटील, आर. सी. घरत, महेंद्र घरत, महाविकास आघाडी उरण- पनवेल, स्व. दि. बा. पाटील शेतकरी संघर्ष समिती व इतर रायगड जिल्ह्यातील शेतकरी संघटना विरोध करायला रस्त्यावर उतरणार होत्या. त्यासंदर्भात शेतक-यांनी लोकप्रतिनिधींसह मा. विभागीय आयुक्त यांच्यासोबत देखील बैठक करण्यात आली होती.

त्याचवेळी दत्तात्रेय शिंदे, नंदकुमार पाटील, समीर खाने या शेतकऱ्यांनी माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली. तात्काळ माजी आमदार सुरेश लाड यांनी मा. खासदार सुनिल तटकरे यांच्यासोबत परिस्थितीचे गांभीर्य व शेतक-यांवरील संकटाची कल्पना दिली. त्यावर खासदार सुनील तटकरे यांनी विषय समजून घेण्यासाठी दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना भेटीसाठी सुतारवाडी-रोहा येथे बोलावून घेतले. सुरेश लाड यांनी विभागीय आयुक्त कोकण विभाग व जिल्हाधिकारी रायगड यांच्यासोबत फोनवर चर्चा करून सदरची कारवाई थांबविण्यास सांगितले.

खासदार सुनिल तटकरे यांनी दत्तात्रेय शिंदे, नंदकुमार पाटील, समीर खाने या शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून संबंधित कागदपत्रांचे वाचन करून अजितदादा पवार यांच्यासोबत फोनवर विषयाचे गांभीर्य सांगून तात्काळ बैठकीसाठी वेळ घेतला. सर्व विषय हाताळण्यासाठी माहिती, कागदपत्रे, अहवाल व इतर पत्रके शेतक-यांचे प्रतिनिधींकडून घेऊन शेतकऱ्यांची बाजू मी मांडेन असे खासदार तटकरेंनी सांगितले.

दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयात अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, माजी आमदार सुरेशभाऊ लाड, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर एच.ओ.सी.एल.व बी.पी.सी.एल. चे व्यवस्थापक, संबंधित मंत्रालयाचे सचिव व शेतकरी संघटनेचे समीर केशव खाने, नंदकुमार पाटील व दत्तात्रेय शिंदे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त कोकण विभाग व जिल्हाधिकारी रायगड यांचे सोबत बबनदादा पाटील, आर. सी. घरत, महेंद्र घरत रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, उपाध्यक्ष रमेश पाटील, सचिव काशिनाथ कांबळे, दीपक बरवी होते.तसेच अलिबाग येथे शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला, गावे, घरे व इतर सोयीसुविधा कायम करणे, त्यासाठी जागेचे नियोजन, रोजगारात संधी, अन्य सुविधा जसेकी दवाखाना, औद्योगिक शिक्षण केंद्र, मैदान व इतर नागरी सुविधा या रास्त मागण्यांबद्दल सुनिलजी तटकरे साहेब यांनी मांडल्या. पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी प्रश्न ६० वर्षे प्रलंबित आहे त्यावर निर्णय होणे आवश्यक आहे असे म्हणाल्या. आमदार बाळाराम पाटील यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य निगडित आहे त्यावर जास्त मोबदला द्यावा असे म्हणाले. माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी येणाऱ्या उद्योगधंद्यात शेतकऱ्यांचे हक्क मिळावेत असे म्हणणे मांडले. सदर सर्व मागण्यांबाबत लवकरात लवकर महसूल विभागातर्फे मसुदा कॅबिनेटकडे सादर करून मान्य करण्यात येईल असे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे बबनदादा पाटील यांनी प्रथम खासदार सुनिल तटकरे यांचे उपमुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. व सर्व कामे थांबविण्यात यावी असे सांगितले.
त्यानंतर माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी मौजे पराडे, दापिवली व आंबिवली या गावांचे नियोजित पुनर्वसन न झाल्याने या गावांच्या सोयीसुविधांची जबाबदारी शासनाने घेऊन नियोजन करावे व या गावांबाबतचा साठ वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली काढावा असे म्हणणे मांडले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

अशाप्रकारे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी मंत्रालयात एच. ओ. सी. एल. रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठकीत सर्वच विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक चर्चा झाल्याने माजी सरपंच संदिप मुंढे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे फोनवरून आभार मानल्याचे समजते.तसेच रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांची बाजू मांडणा-या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.