नुसती “आई” असली तरी,
काहीच नसतं कमी!
एकच जागा विश्वासाची,
ज्याचीच फक्त हमी!
तिची चोच उपाशी पण,
तिला ठाऊक भरवणं!
ओघळणारं खारं पाणी,
आतल्या आत जिरवणं!
आई छप्पर होते तेव्हा,
लहान वाटतं घर!
एकच नातं,ज्याच्या ओठात,
काळीजओला स्वर!
पंख असेल,पदर असेल,
त्यात ऊब सावली!
सगळी नाती मुठीत मावतात,
आई कुठे मावली?
चिमणी असो,माणूस असो,
आई….फक्त आई!
स्वतःसाठी सावकाश तेवढी,
बाळासाठी घाई!
देव किंवा राजा होण्यात,
आतून कुठे रुजतं?
चिमणे दात चावतात तेव्हाच,
तिचंच बोट सुजतं!
तरी दातात बोट देते,
त्यालाच म्हणतात आई!
तिचं जाग्रण बाळासाठी,
गात असतं अंगाई!
वेदनेचा आवाज होतो,
तिच्याच कानात अक्षर!
शाळेत गेली नाही तरी,
तीच असते साक्षर!
म्हणून आई जाते तेव्हा,
जग होतं रितं!
तेव्हा स्वार्थ खरा कळतो,
शितं तिथे भुतं!
तीन चोचा घेणाऱ्या नि
एक चोच देणारी!
स्वर्ग,मृत्यू आणि पाताळ,
सहज कुशीत घेणारी!
प्रमोद जोशी.देवगड.







Be First to Comment