Press "Enter" to skip to content

वाचा हा विषेश लेख : कोरोना.. डरना मना है !

नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक यांचा अनोख्या शैलीतील विशेष लेख 🔶🔷🔶🔷

डरना मना है

अमेरिकेच्या एका शास्त्रज्ञाने पाच वर्षे हा करोना फरोना जात नाही असं जाहीर केलं आहे अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील एखाद्याा शास्त्रज्ञाने काही सांगितले की आपला त्यावर लगेच विश्वाास बसतो. आम्ही शास्त्रज्ञ नाही पण एक लॉजिक म्हणून जगातील इतर आजाराप्रमाणे हा एक आजार असून तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होणार असं पहिल्या लेखात म्हटलं होतं पण आपलं ऐकतो कोण ? आपण ना शास्त्रज्ञ ना भविष्यवेत्ता. जगात सर्वाधिक लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इस्टिट्यूटच्या आदर पूनावाला यांनीही लस आली तर ती आपल्यापर्यंत पोहचण्यास दोन वर्षे लागतील. असं म्हटलं आहे. म्हणजे ती पहिल्यांदा प्रगत देशांना आणि नंतर उरली सुरली आपल्या देशातील इंडियाला मिळणार आहे. देशाचे कळत न कळत दोन भाग पडले आहेत. हे आपल्या लक्षात येत नाही. एक इंडिया आणि दुसरा भारत. इंडियाला सुशांत, रिया, कंगनासारख्या फालतू विषयात रस आहे तर भारताला महागाई, बेरोजगारी, घसरलेला जीडीपी आणि कांद्यााची लागलेली वाट याची चिंता भेडसावत आहे.
प्रगत देशांच्या दृष्टीने आपण तसे भिकारीच. त्यामुळे आपल्या अदिवासी बांधवांना ही लस बाजारात आली तरी ती त्यांना मिळेपर्यंत चार पाच वर्षे लागतील. सर्व सरकारी कंपन्या विकत घेऊन आपल्या देशातील मुकेश अंबानी तोपर्यंत जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत झालेली असतील. ही एक आनंदाची बाब. कधी काळी इस्ट इंडिया नावाच्या ब्रिटिश कंपनीने ओळखला जाणारा आपला देश काही वर्षात रिलायन्स इंडिया नावाने ओळखला जाईल आणि आपण म्हणू आम्ही सुखी समृद्ध झालो. अंबानी एक नंबरचे श्रीमंत झाले याचा अर्थ लस सर्वांना मिळेल असा होणार नाही. असो. आपला विषय आहे, आता जगायचं कसं ? युध्दात गेलेल्या सैनिकाला कुणी लढायचं कसं हे सांगतं का ? नाही ना ? त्यासाठी त्याने लढण्याचे ट्रेनिंग घेतलेलं असतं. करोना नावाच्या कौरवाबरोबर लढण्यासाठी मानव नावाच्या पांडवांनी लढण्याचे शिक्षण घेणे गरजेचं आहे. महाभारतात कौरव मृत्यू पावले पण सर्व पांडव जगले. त्याच प्रमाणे मानव जात जीवन्त राहणार आहे. त्या युध्दातही सैनिकांची अतोनात हानी झाली होती. या युध्दातही तशा प्रकारची हानी होणार आहे. जो जगला तो योध्दा आणि जो मेला तो शहिद एवढं साधं समीकरण आहे. जगण्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते करा, नव्हे माणूस ते करतोच. संपूर्ण शरीरभर चिलखत घातलं तरी चालेल पण करोनाचा वार चुकवता आला पहिजे. इथे तर फक्त तोंड सांभाळणेच महत्त्वाच आहे. करोना हातावरुन उडत उडत नाका तोंडात जात नाही. आपण सवयीप्रमाणे हात सारखे तोंडाजवळ घेऊन जातो म्हणून तो शरीरात प्रवेश करतो. शरीरात घुसला की त्याचं राज्य सुरू होतं. त्याचं सैन्य कैक पटीने वाढतं. करोनाला शरीराबाहेर रोखणे महत्वाचे आहे. त्यासाठी काही नियम जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिले आहेत.त्याचं पालन करणं आपल्या हातात आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून ती अधिक शिथिल होणार आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.एवढ्या मोठ्या देशाला सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करणं शक्य नाही मग जग नावाच्या रणांगणावर दिवसभर लढाई करुन संध्याकाळी सुखरुप येण्याचे कसब जमलं पाहिजे. काहीजण सर्व काळजी घेत आहेत. तरीही त्यांना करोना गाठत आहे. मग हे कसं, असा प्रश्न पडतो. करोनाने तुम्हाला गाठलं याचा अर्थच तुम्ही एखाद्याा क्षणी बेसावध होतात असा होतो. ‘करोना झाला म्हणजे आता सर्व काही संपलं’ असा विचार करतच रुग्ण उपचार घेत आहेत. ‘करोना’ झाल्यास मृत्यूच्या भीतीने अनेकांनी मृत्यूपत्रेही लिहून ठेवली आहेत. करोना झालेले ९५ टक्के रुग्ण काही दिवसात बरे होऊन घरी जात आहेत. त्यातील काही जणांचे खिसे खासगी रुग्णालये खाली करत आहेत. जीवाची पर्वा न करता सेवा धर्म पाळणाऱ्या डॉक्टरांबरोबरच टाळूवरचं लोणी खाणारे हजारो डॉक्टर आजही आहेत. आमच्या बिल्डिंगमध्ये एक तरुणाचे नुकतेच करोनाने निधन झाले. तीन वर्षापूर्वीच त्याच लग्न झालं होतं. सहा महिन्यापूर्वी त्याला जुळी मुलं झाली होती. सर्दी, खोकला आणि ताप आला. घरच्यांनी मुलुंडच्या एका रुग्णालयात अ‍ॅडमिट केले. नशिबाने पत्नी आणि ती दोन जुळी माहेरात होती. करोनाचा लागण झाल्यावर धडधाकट असलेल्या तरुणाचे अवसान गळले. तीन हार्ट अ‍ॅटक लागोपाठ आले. त्यात त्याचे निधन झाले. करोनापेक्षा भीतीने गर्भगळीत होऊन रुग्ण दगावत आहेत. जगात तीन कोटीपेक्षा जास्त रुग्णसंख्या झाली आहे. आपणही पन्नास लाखाचा आकडा पार करुन जगात दुसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. अमेरिकेत मृत्यू पावणाऱ्याची संख्या दोन लाखापेक्षा जास्त आहे आणि भारतात ही संख्या सध्या पंच्याऐैशी हजारांच्या घरात आहे.आपण रुग्ण आणि मृत्यू च्या बाबतीत लवकरच जगात एक नंबर वर येऊ. पण सद्यस्थितीत भारतीय स्ट्रॉग आहेत. त्यांची रोग प्रतिकार शक्ती इतर देशांच्या तुलनेत बलवान आहे. धारावी, मालेगाव, मध्ये हे दिसून आले आहे. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये ही रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे. अमेरिका आणि युरोप मधील नागरीक हे तसे फुसके. त्यामुळे साधा खोकला आणि सर्दी झाली तरी ते आकाश कोसळल्याच्या अर्विभावात असतात. या उलट अनेक भारतीयांनी पावसाळ्यात झालेल्या सर्दी खोकला तापावर घरच्या घरी उपाय शोधून उपचार केलेले आहेत. आपल्या देशात रोगापेक्षा इलाज जालीम असल्याने रुग्णालयात जाण्याचे अनेकांनी टाळले आहे. ते करोनाच्या वाढत्या प्रसाराला कारणीभूत झाले असले तरी शासकीय रुग्णालयांवर जनतेचा विश्वाास नाही, हे देखील वास्तव आहे. याचा अर्थ सर्वच यंत्रणा तकलादू आहे असा होत नाही. स्टॉंग रोग प्रतिकार शक्तीबरोबरच आपल्याकडे आर्युवेद आहे. ‘दिवार’मधील शशी कपूरच्या डायलॉग सारखं हे आहे. ‘मेरे पास मॉ है.’ आयुर्वेदाइतकी प्रभावी उपचार पद्धती जगात अन्यत्र नाही. लाखो भारतीयांनी या सहा महिन्यात विविध प्रकारच्या काढयांवर विश्वास ठेवलेला आहे. त्यातूनच त्यांची सकारात्मक उर्जा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे. करोना आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. जसे इतर कोणताही आजार आपल्याला होऊ शकतो, तसाच करोनाही होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे. लस आणि औषधांचा शोध लागल्यावर त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. त्याचा प्रभाव कमी होईल. पण तो जाणार नाही.‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ यासारख्या जाहिरती बघतच आपण मोठे झालेलो आहोत. ‘काही दिवसांनी करोना रोगी कळवा आणि पाच हजार रुपये मिळवा’ अशी एखादी जाहिरात दिसेल. या जीवन नावाच्या प्रवासात जगणं महत्वाचे असल्याने ते कसे जगायचे ते ज्याने त्याने ठरवावं. प्रवास करताना अपघात होणार नाही याची काळजी घेतो तसे. संपूर्ण काळजी घेऊन दिवसभरातील कामे आटपत आपण सुखरुप घरी येऊ शकतो किंवा करोनाला सोबत आणू शकतो. तो स्वत:हून सोबत येत नाही. आपणच त्याला निमंत्रण देतो. चल आमच्या घरी म्हणून. आणि पुरेशी काळजी घेऊन जर तो आलाच तर मात्र घाबरुन जाऊ नका. त्याचं आगत स्वागत करा. खाऊ पिऊ घाला. त्याच्याबरोबर दोस्ती करा. सांगा त्याला. ‘मित्रा, त्रास देऊ नकोस. खा, पी, मजा कर, चार पाच दिवस थांब आणि आनंदात जा.’ बघा फरक पडेल. सकारात्मक राहा. ‘जो डर गया सो मर गया’ हा ‘शोेले’तील डायलॉग सर्वांनाच माहित आहे. त्यापुढे जाऊन. रामगोपाल वर्माच्या एका चित्रपटाचे नावच आहे. ‘डरना मना है.’ होय, यहा अब, डरना मना है !
———————- ————–

लेखक : विकास महाडिक, ज्येष्ठ पत्रकार

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.