
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने रायगड जिल्हा परिषदेतील शाळांमधून शैक्षणिक वाटप करत आपली परंपरा जपली आहे. बुधवार दिनांक 17 जून रोजी सुकापुर केंद्र अंतर्गत येणाऱ्या चिपळे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्येष्ठ पत्रकार तथा सल्लागार माधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
पनवेल तालुका पत्रकार विकास मंच या पत्रकारांच्या सेवाभावी संस्थेने गेल्या दोन दशकापासून शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची परंपरा अखंडपणे राबविली आहे. यंदाचे वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला एक बटण छत्री, स्वच्छता किट, एक लाँग बुक, दोन शॉर्ट बुक, पेन पट्टी पेन्सिल खोडरबर शार्पनर किट आणि गुड डे बिस्किट्स असे साहित्य प्रदान करण्यात आले. मुख्याध्यापिका माधवी दिवेकर यांनी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सर्व सदस्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मंचाचे सल्लागार मंदार दोंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तसेच पनवेल तालुका पत्रकार विकास मंच सातत्याने करत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे बाबत उपस्थितांना अवगत केले. शिक्षिका प्रिया भोसले यांनी शैक्षणिक वर्ष 26- 27 करता साहित्य वाटप केल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे आभार मानले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या माध्यमातून यापूर्वी रायगड जिल्हा परिषद अंतर्गत शाळांना ई लर्निंग सिस्टीम, संगणक, ध्वनीक्षेपक, वर्ग बांधून देणे, कपाटे, बोलक्या भिंती रंगवून देणे अशा प्रकारे सहाय्य करण्यात आले आहे. मागच्या वर्षी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने 100 देशी वृक्षांचे रोपण केले,150 मुलींना “गुड टच बॅड टच“ याचे तज्ञांचे माध्यमातून समुपदेशन केले. पत्रकार सदस्यांना अपघात विमा वाटप देखील करण्यात आला आहे.

यावेळी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लवकरच 2000 वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आम्ही हाती घेणार असल्याचे सांगितले तसेच समाजाची दिशा आणि दशा ठरवणाऱ्या जेष्ठ विचारवंतांची व्याख्यानमाला देखील आयोजित करणार असल्याची घोषणा केली. समाजातील घटना घडामोडी सातत्याने प्रकाशित करणारी सजग लेखणी जोपासणारे मंचातील सदस्य सामाजिक जाणीव जागृत ठेवून समाजातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचत आपले योगदान देत असल्याबद्दल धनंजय पाटील यांनी मंचातील सदस्यांचे कौतुक केले.
चिपळे येथील शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार मंदार दोंदे, सल्लागार विवेक पाटील, सल्लागार संजय कदम, उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, सरचिटणीस हरेश साठे खजिनदार दत्ता कुलकर्णी, सन्माननीय सदस्य प्रवीण मोहोकर, आजीव खजिनदार नितीन कोळी, लालचंद यादव, चिपळे माजी उपसरपंच धनंजय पाटील, पराग म्हात्रे अक्षय पाटील, अजय पाटील, शिक्षिका प्रिया भोसले यांची सन्माननीय उपस्थिती होती.




Be First to Comment