Press "Enter" to skip to content

मी आणि ती…..

मी आणि ती…..

आई लेकीचं
नातं असतं आगळं….
कितीही शब्दबद्ध केलं तरी
सर्वांपेक्षा वेगळं….

येते जेव्हा ती
पहिल्यांदा कुशीत….
माझंच बालरूप पाहून
येते मी खुशीत…

लोण्याचा गोळा धरताना
उडते आपली फजिती
गालातल्या गालात हसत म्हणते
वाटते कशाची भिती?

छोट्या छोट्या डोळ्यांनी
टुकूटुकू बघते…
क्षणात मग आपल्याला
अंतरीची ओळख पटते…

तिचं हसणं,रूसणं, नाचणं,खेळणं
यात आपण गुंतून जातो…
त्रयस्थपणे तिला निरखत
पुन्हा आपलं बालपण शोधतो.

शाळेत जाताना हात सोडल्यावर
काळीज आपले लककन् हालते
भविष्यातील पाठवणीची
जणू रंगीत तालीमच होते…

वेगवेगळी वळणे घेत
आयुष्य तिचं फुलत असतं
मायेचं आधाराचं छत्र धरताना
आपल्याला आसमान ठेंगणं होतं

लहान माझी बाहुली म्हणताना
मग तो दिवस येतो…
काळीज आपलं दुसरंयाला देताना
हात निश्चितच थरथरतो…

पण पिल्लू मात्र खुश असतं
स्वबळावर झेपावायला …
मायेचे, विश्वासाचे पंख लेवून
गगन भरारी मारायला…

कितीही मोठी झाली तरी
आपल्यात अंतर पडत नाही
सुखदुःखात दुखण्याखुपण्यात
तिच्या तोंडात फक्त आई….

वरदा जोशी, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.